‘एलएसी’जवळ तैनात चिनी जवानांचे मनोधैर्य वाढविण्याचा जिनपिंग यांचा प्रयत्न

बीजिंग – लडाखच्या एलएसीजवळ तैनात भारतीय सैनिक उणे तापमानातही सहजरित्या टेकड्या सर करीत आहेत. भारतीय सैनिक येथील बर्फात खेळत, गाणे गात असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. तर एलएसीच्या पलिकडे चीनच्या जवानांना टेकडी सर करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करावा लागत आहे. मानसिक व शारीरिक सामर्थ्याची कसोटी घेणाऱ्या या वातावरणात चीनचे लष्कर टिकाव धरू शकत नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. चीनच्या सोशल मीडियातूनही दबक्या आवाजात का होईना, पण आपल्या लष्कराच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत एलएसीजवळ तैनात आपल्या जवानांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केला. व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आपल्या जवानांची युद्धसज्जतेची पाहणी केल्याची बातमी चीनच्या मुखपत्राने दिली.

Chinese soldiersपँगाँग सरोवर व एलएसीजवळच्या इतर भागातील तापमान उणे 10च्याही खाली पोहोचले आहे. अशा वातावरणात चिनी जवानांची प्रकृती ढासळत असल्याचे प्रकार वर्षभरापूर्वी समोर आले होते. प्राणवायू विरळ असलेल्या एलएसीजवळच्या टेकड्यांवरील तैनाती कायम रहावी, म्हणून चीनला सातत्याने जवानांची बदली करावी लागली होती. तर 2020 सालच्या गलवानमधील संघर्षानंतर येथील चीनच्या लष्करी कमांडची सूत्रे सांभाळणाऱ्या जनरल पदावरील अधिकाऱ्यांना देखील श्वास घेण्यात त्रास झाल्यामुळे आपला प्राण गमवावा लागल्याची बातमी चीनच्याच माध्यमाने प्रसिद्ध केली होती. त्यामुळे एलएसीजवळची तैनाती ही चीनच्या लष्करासाठी मोठे आव्हान ठरत आहे. येथील तैनाती सोपी करण्यासाठी चीनच्या लष्कराने आत्तापर्यंत वेगवेगळ्या पर्यायांचा वापर केला आहे. एक्सोस्केलेटॉनने सज्ज जवानांना टेकड्या सर करतानाचे व्हिडिओ चीनच्या सरकारी मुखपत्राने प्रसिद्ध केले होते. तर चिनी जवानांसाठी विशेष बनावटीचे तंबू तयार केल्याच्या बातम्याही सोडण्यात आल्या होत्या. काही आठवड्यांपूर्वी चीनचे जवान ऑक्सिजनच्या सिलेंडरसह टेकडी चढतानाचे व्हिडिओ समोर आले होते. भारतीय सैनिकांची बरोबरी करण्यासाठी चीन केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे यामुळे उघड झाले होते. पण या आघाडीवर अपयशी ठरल्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून एलएसीजवळ तैनात आपल्या जवानांशी संपर्क साधून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी येथील युद्धसज्जतेची व्हर्च्युअल पाहणी केल्याचे सांगून चीन भारताला संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे.

दरम्यान, लडाखच्या एलएसीजवळच्या तणावासाठी चीन जबाबदार असल्याचा आरोप भारत सातत्याने करीत आहे. हा तणाव कमी करण्यासाठी आत्तापर्यंत भारत आणि चीनच्या लष्करात आत्तापर्यंत चर्चेच्या 17 फेऱ्या झाल्या आहेत. पण दोन मुद्यांवरुन अजूनही ही चर्चा पूर्णपणे यशस्वी ठरलेली नाही.

leave a reply