रशिया-चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन आफ्रिका दौऱ्यावर

डकार/वॉशिंग्टन – चीन व रशिया आफ्रिका खंडातील आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असतानाच अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन आफ्रिकेच्या दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. येलेन यांचा आफ्रिका दौरा दहा दिवसांचा असून या कालावधीत त्या सेनेगल, झांबिया व दक्षिण आफ्रिका या तीन देशांना भेट देणार आहेत. काही दिवसांपूर्वीच चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग यांनी आफ्रिकन देशांचा दौरा करून चीनविरोधातील नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर अमेरिकी अर्थमंत्र्यांनी आफ्रिकेला भेट देणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

चीनने गेल्या दोन दशकांमध्ये आफ्रिका खंडात हातपाय पसरण्यात यश मिळविले आहे. चीनने या खंडात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली असून जिबौतीसारख्या देशात परदेशातील पहिला चिनी संरक्षणतळ उभारून चीनने आपली महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली आहे. ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह’ या योजनेअंतर्गतही चीनने आफ्रिका खंडाला प्राधान्य दिल्याचे दिसून आले होते. दुसऱ्या बाजूला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही आफ्रिकेतील प्रभाव वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. इंधन व संरक्षणक्षेत्रातील सहकार्याच्या बळावर रशियाने आफ्रिकेतील सहकारी देशांच्या संख्येत भर टाकण्यास सुरुवात केली आहे. रशियातील कंत्राटी सुरक्षा कंपनी असणाऱ्या ‘वॅग्नर ग्रुप’ने आफ्रिकेतील काही देशांमध्ये आपली पथके तैनात केली असून त्या माध्यमातून रशिया आपला पाया अधिक विस्तारण्याचा प्रयत्न करीत आहे.

चीन व रशियाच्या या हालचालींमुळे अमेरिका तसेच युरोपचा आफ्रिकेतील प्रभाव कमी झाला आहे. आफ्रिकन देश चीन व रशियाच्या कलाने निर्णय घेत असल्याचे समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेसह अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आफ्रिकी देशांनी चीनला साथ दिली आहे. तर रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनची बाजू घेऊन त्याला सहाय्य पुरविण्यास अनेक आफ्रिकी देशांनी नकार दिला होता. यामुळे अमेरिकेसह युरोपिय देश अस्वस्थ झाले असून पुन्हा आफ्रिका खंडातील आपला प्रभाव वाढविण्यासाठी हालचाली करीत आहेत. अमेरिकेने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र ‘आफ्रिका स्ट्रॅटेजी’ जाहीर केली होती. त्याचवेळी अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघटनेतील राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड व परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी आफ्रिकेचा दौरा केला होता. डिसेंबर महिन्यात आफ्रिकी देशांच्या राष्ट्रप्रमुखांबरोबर व्यापक परिषदेचेही आयोजन करण्यात आले होते.

याचा पुढचा टप्पा म्हणून अमेरिकी अर्थमंत्री येलेन यांच्या आफ्रिका दौऱ्याकडे पाहिले जाते. अमेरिका व जागतिक वित्तसंस्थांकडून आफ्रिकेला देण्यात येणारे अर्थसहाय्य आणि इतर सहकार्याचे महत्त्व पटवून देणे, हा येलेन यांच्या दौऱ्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात येते. सेनेगलमधील आपल्या दौऱ्यात येलेन यांनी राजकीय नेत्यांबरोबरच युवा उद्योजक तसेच इतर आघाडीच्या उद्योजकांबरोबर संवाद साधण्यावर भर दिला. यावेळी आफ्रिकेतील युवा वर्गाची वाढती टक्केवारी हा आफ्रिका खंडाच्या विकासासाठी निर्णायक बाब ठरते, याची जाणीवही येलेन यांनी करून दिली. त्याचवेळी आफ्रिकेला कर्जाच्या विळख्यात अडकवू पाहणाऱ्या चीनवर येलेन यांनी टीकास्त्र सोडले. ‘भुरळ घालणाऱ्या, पण अपारदर्शी करारांपासून आफ्रिकी देशांनी दूर रहावे. अशा करारांमध्ये लोकांना सहाय्य करण्याचा देखावा निर्माण केला असला तरी अखेरीस असे करार अपयशीच ठरतात’, अशी टीका येलेन यांनी केली. त्याचवेळी आफ्रिकी देशांना कर्ज देणाऱ्या चीनसारख्या देशांनी सध्याच्या काळात या देशांना कर्जमाफी देऊन पूर्वपदावर आणण्यासाठी सहाय्य करायला हवे, असा सल्लाही येलेन यांनी दिला. योग्य वेळी कर्जमाफी दिली तर ती देणाऱ्या व घेणाऱ्या अशा दोन्ही देशांसाठी उपयुक्त ठरेल, असा टोलाही अमेरिकी अर्थमंत्र्यांनी यावेळी लगावला.

दक्षिण आफ्रिकेबरोबर रशिया व चीनचे नौदल सराव करणार

मॉस्को/प्रिटोरिआ – रशिया व चीन फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेबरोबर नौदल सरावात सहभागी होणार आहेत. ‘ऑपरेशन मोसी’ नावाचा हा बहुराष्ट्रीय सराव 17 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत पार पडेल, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेचा लष्कराने दिली. दरबान व रिचर्डस्‌‍ बे या भागातील सागरी क्षेत्रात सराव पार पडणार असल्याचेही दक्षिण आफ्रिकेकडून सांगण्यात आले. हा सराव चीन व रशियाच्या आफ्रिकेतील वाढत्या प्रभावाचे संकेत देणारा ठरतो, असा दावा विश्लेषक करीत आहेत.

यापूर्वी 2019 साली दक्षिण आफ्रिकेने रशिया व चीनबरोबर संयुक्त नौदल सराव केला होता. ‘ब्रिक्स’ गटाचा सदस्य असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेबरोबर रशिया व चीन या दोन्ही देशांनी चांगले संबंध विकसित करण्यात यश मिळविले आहे.

leave a reply