इस्रायलबरोबरील मतभेद तीव्र झालेले असतानाच जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे अमेरिकेच्या भेटीवर

वॉशिंग्टन – जॉर्डनचे किंग अब्दुल्ला दुसरे अमेरिकेच्या भेटीवर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याबरोबर त्यांची खाजगी चर्चा पार पडली. या चर्चेनंतर जेरूसलेममधील यथास्थिती कायम राखण्याची आवश्यकता असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे. त्यांचे हे उद्गार इस्रायलच्या नव्या सरकारला संदेश देणारे असल्याचे दिसते.

गेल्या काही दिवसांपासून इस्रायल जेरूसलेममधील इस्लामधर्मियांसाठी पवित्र असलेल्या अल अक्सा प्रार्थनास्थळाच्या प्रशासनात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप होत आहे. जेरूसलेममधील हे प्रार्थनास्थळ ज्यूधर्मियांसाठी टेंपल माऊंट म्हणून प्रसिद्ध आहे. यावरील वाद टाळण्यासाठी याचे व्यवस्थापन जॉर्डनकडे सोपविण्यात आले होते. पण जॉर्डनकडून या प्रार्थनास्थळाचे व्यवस्थापन आपल्या हाती घेण्याची तयारी इस्रायलने केलेली आहे, असे दावे केले जातात. काही दिवसांपूर्वीच इस्रायलने जॉर्डनच्या राजदूतांना या प्रार्थनास्थळाला भेट देण्यापासून रोखले होते.

इस्रायलचे नॅशनल सिक्युरिटी मिनिस्टर व अतिउजवे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले बेन-ग्वीर यांनी या प्रार्थनास्थळाला भेट दिली होती. त्यांची ही भेट वादग्रस्त ठरली आणि त्याचे फार मोठे पडसाद उमटले होते. पण बेन-ग्वीर यांनी आपण पुढच्या काळातही या प्रार्थनास्थळाला भेट देणार असल्याचे सांगून हा वाद अधिकच वाढविला होता. यानंतर इस्रायल या प्रार्थनास्थळाचे व्यवस्थापन जॉर्डनच्या हातून काढून घेणार असल्याची चर्चा तीव्र झाली होती.

या पार्श्वभूमीवर, जॉर्डनचे किंग अब्दुल्ला दुसरे अमेरिकेच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी चर्चा केल्यानंतर, अल अक्सा प्रार्थनास्थळाबाबत बायडेन यांनी केलेल्या विधानांचे महत्त्व वाढले आहे. जेरूसलेममधील यथास्थिती कायम राखायला हवी, अशी भूमिका यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मांडली. ही यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न इस्रायलकडून सुरू असताना, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आपल्या उद्गारांद्वारे त्यावर नाराजी व्यक्त केल्याचे दिसते.

याआधी वेस्ट बँक व गाझा या पॅलेस्टाईनच्या भागात इस्रायली नागरिकांसाठी उभारल्या जात असलेल्या वस्त्यांच्या बांधकामावरून अमेरिकेने इस्रायलला इशारा दिला होता. या प्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघात इस्रायलच्या विरोधात ठराव देखील मंजूर झालेला आहे. यावर इस्रायलकडून संतप्त प्रतिक्रिया आली व कुणी कितीही दबाव टाकला तरी इस्रायल या वस्त्यांचे बांधकाम केल्यावाचून राहणार नाही, असा इशारा इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिला होता. त्यानंतरच्या काळात इस्रायल व अमेरिकेच्या बायडेन प्रशासनातील दुरावा अधिकच वाढल्याचे दावे केले जातात.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी इस्रायलचा दौरा केल्यानंतरही इस्रायलचे नेत्यान्याहू सरकार व बायडेन प्रशासनामधील मतभेदांची तीव्रता कमी झालेली नसल्याचे दावे केले जातात. जॉर्डनचे किंग अब्दुल्ला दुसरे यांच्याबरोबरील खाजगी भेटीनंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली सूचक विधाने त्याचीच साक्ष देत आहेत.

leave a reply