रशियाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अमेरिका जर्मनीला पाच ‘पोसायडन’ टेहळणी विमाने पुरविणार

वॉशिंग्टन/बर्लिन – काही दिवसांपूर्वी रशियाच्या युरोपातील हालचाली रोखण्यासाठी ‘बॉम्बर्स’ तैनात करणार्‍या अमेरिकेने रशियाविरोधात अधिक आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जर्मनीला पाच ‘पोसायडन मेरिटाईम पेट्रोल एअरक्राफ्ट’ पुरविण्यास मंजुरी दिली आहे. ही विमाने टेहळणीबरोबरच ‘अँटी सबमरिन वॉरफेअर’ व ‘अँटी सरफेस वॉरफेअर’ची क्षमता असणारी प्रगत विमाने म्हणून ओळखण्यात येतात.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचा भाग असणार्‍या ‘डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी’ने शुक्रवारी जर्मनीला देण्यात येणार्‍या विमानांसंदर्भातील माहिती जाहीर केली. त्यानुसार, अमेरिकेची ‘बोईंग’ कंपनी जर्मनीला पाच ‘पी-8ए पोसायडन’ विमाने पुरविणार आहे. या विमानांबरोबरच इंजिन्स, सेन्सर्स, रडार्स, इलेक्ट्रॉनिक काऊंटरमेजर सिस्टिम्स, सॉफ्टवेअर व इतर संबंधित यंत्रणाही देण्यात येणार आहेत. हा करार सुमारे 1.77 अब्ज डॉलर्सचा आहे. करारानुसार अमेरिकी अधिकार्‍यांचे एक पथकही दोन वर्षांसाठी जर्मनीत तैनात करण्यात येणार आहे.

‘नाटोतील महत्त्वाच्या मित्रदेशाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी विमानांच्या विक्रीला मान्यता देण्यात आली आहे. या करारामुळे युरोपचे राजकीय व आर्थिक स्थैर्य कायम राहण्यास सहाय्य होईल. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिने सदर करार महत्त्वाचा ठरतो’, असे ‘डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी’ने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या परराष्ट्र धोरणाच्या आराखड्यात रशियाला लक्ष्य करण्याचे संकेत दिले होते. जर्मनीला प्रगत टेहळणी विमाने पुरविण्याचा निर्णय त्याचाच भाग दिसतो. गेल्या महिन्याभरात बायडेन प्रशासनाने रशियाला लक्ष्य करण्यासाठी अनेक निर्णय घेतले होते. त्यात नॉर्वेतील तळावर ‘बॉम्बर्स’ची तैनाती व युक्रेनला 12.5 कोटी डॉलर्सच्या लष्करी सहाय्याची घोषणा यासारख्या निर्णयांचा समावेश आहे.

दरम्यान, अमेरिका नाटोतील सहकारी देशांची सुरक्षा भक्कम करण्यासाठी पावले उचलत असली तरी रशिया व युरोपमधील संघर्षात रशियाच वरचढ ठरेल, असा दावा स्वीडनच्या लष्करी यंत्रणेने केला आहे. ‘स्वीडिश डिफेन्स रिसर्च एजन्सी’ने(एफआयओ) यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात रशियाकडे मोठ्या प्रमाणात संरक्षणसामर्थ्य उपलब्ध असून त्या बळावर ते ‘नाटो’च्या पूर्व युरोपातील देशांवर झटपट हल्ला चढवू शकतात, असे बजावले आहे. नाटोला प्रत्युत्तरासाठी वेळ मिळण्यापूर्वीच रशिया युरोपातील मोठ्या भागावर ताबा मिळवू शकतो, असा इशाराही स्वीडिश यंत्रणेने दिला आहे.

काही दिवसांपूर्वी पोलंडच्या माजी लष्करी सल्लागारांनीही, रशिया दोन ते चार दिवसात युरोपातील बाल्टिक देशांवर नियंत्रण मिळवू शकते, असे वक्तव्य केले होते.

leave a reply