ब्राझिलमध्ये २४ तासात कोरोनाचे दोन हजारांहून अधिक बळी

ब्रासिलिया/बीजिंग – ब्राझिलमध्ये कोरोनाव्हायरसच्या नव्या प्रकाराने हाहाकार उडविला असून बुधवारी २४ तासांमध्ये दोन हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर ब्राझिलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावण्याची ही पहिलीच वेळ आहे. दर दिवशी वाढणारे रुग्ण व बळींची संख्या या प्रकारात ब्राझिलने अमेरिकेला मागे टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली. ब्राझिल सरकारने व्यापक पातळीवर लसीकरण मोहीम राबविली नाही तर कोरोनाची साथ देशासाठी मोठी शोकांतिका ठरेल, अशी भीती वरिष्ठ वैद्यक तज्ज्ञ डॉक्टर पेड्रो हल्लाल यांनी व्यक्त केली आहे.

२०१९ सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने आतापर्यंत जगभरात २६ लाखांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. १८०हून अधिक देशांमधील सुमारे १२ कोटी जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील साडेसहा कोटींहून अधिक नागरिक उपचारांसह बरे झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून अमेरिका, ब्रिटन, चीन, रशिया, भारत यांच्यासह युरोपिय देश तसेच आखाती व आफ्रिकी देशांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे काही देशांमध्ये कोरोनाच्या साथीची तीव्रता कमी होत असल्याचे समोर येत आहे.

मात्र ब्राझिल याला अपवाद ठरला असून या देशात कोरोना साथीची दुसरी लाट आल्याचे सांगण्यात येते. ब्राझिलच्या ‘मनाऊस’ शहरात कोरोना विषाणूचा नवा प्रकार (स्ट्रेन) आढळला असून हा मूळ विषाणूपेक्षाही अधिक घातक असल्याचे समोर आले आहे. ‘पी१’ असे नाव असलला हा प्रकार मूळ विषाणूपेक्षा दुप्पट वेगाने पसरत आहे. कोरोना साथीतून एकदा बरे झालेल्यांनाही या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता २५ ते ६० टक्के असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे.

त्यामुळेच ब्राझिलमध्ये कोरोनाचे रुग्ण प्रचंड वेगाने वाढत असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. ब्राझिलच्या सर्व राज्यांमधील प्रमुख रुग्णालयांमध्ये ‘अतिदक्षता विभाग’ ८० ते ९० टक्के भरले आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसून, साथीचा वेग कायम राहिला तर ब्राझिलची आरोग्यव्यवस्था कोलमडून पडेल असा इशारा वैद्यकतज्ज्ञांनी दिला आहे.

ब्राझिलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी १३ लाखांवर गेली असून बळींची संख्या दोन लाख ७३ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात ब्राझिलमध्ये सात दिवसांमध्ये १० हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे, याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले. ब्राझिलमधील साथीला रोखायचे असेल तर लसीकरणाच्या मोहिमेला वेग देणे आवश्यक असल्याचे बजावण्यात आले आहे. सध्या ब्राझिलमधील फक्त पाच टक्के नागरिकांना लसीकरण करण्यात यश मिळाल्याचे सांगण्यात येते.

leave a reply