लडाखच्या एलएसीवरील भूमी गमावलेली नाही

- संरक्षण मंत्रालयाची ग्वाही

भूमी गमावलेली नाहीनवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरून सैन्यमाघारी घेण्यावर चीनबरोबर सहमती झालेली असली, तरी भारताने आपली भूमी गमावलेली नाही, असे स्पष्टीकरण संरक्षण मंत्रालयाने दिले आहे. त्याचवेळी लडाखच्या एलएसीवरील फिंगर आठपर्यंत भारताचा भूभाग असून इथे गस्त घालण्याचा अधिकार भारत राखून ठेवत असल्याचेही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. या क्षेत्रातून सैन्य माघारी घेण्यासाठी भारताने गस्त घालण्याचा आपला अधिकार सोडून दिला आणि चीनला ही भूमी बहार केली, असा आक्षेप काहीजणांनी नोंदविला होता. त्यावर संरक्षण मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे.

गेल्या दहा महिन्यांपासून लडाखच्या पँगाँग सरोवराच्या उत्तर व दक्षिणेकडे भारत व चीनचे सैन्य तैनात होते. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेर्‍या पार पडल्यानंतरही हा वाद कायम राहिला होता. पण आता चीनने या क्षेत्रातून माघार घेण्याच्या हालचाली केल्या आहेत. लडाखच्या एलएसीवरून चीनचे रणगाडे मागे फिरू लागले आहेत. भारतीय लष्कर मागणी करीत होते त्यानुसार चीनचे सैन्य फिंगर आठच्या मागे जाण्याची तयारी करीत आहे. तर भारतीय सैन्यानेही फिंगर तीनवरील आपल्या तळावर परत येण्याची तयारी दाखविली आहे. या प्रश्‍नावर लष्करी तसेच राजनैतिक वाटाघाटीतून तोडगा निघेपर्यंत उभय देशांनी सदर क्षेत्रात लष्करी गस्त न घालण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी याची माहिती संसदेत दिली होती.

यावर काहीजणांनी आक्षेप घेतला घेऊन यामुळे सदर क्षेत्रातील फिंगर तीनच्या पुढील भाग चीनला सोडून दिल्याची टीका भारत सरकारवर केली होती. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने याबाब खुलासा केला. भारताची हद्द फिंगर आठपर्यंत आहे आणि तिथपर्यंत गस्त घालण्याचा अधिकार भारताने आपल्याकडे राखून ठेवलेला आहे, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच ६२ सालच्या युद्धात चीनने बळकावलेली ४३ हजार चौरस किलोमीटर इतकी भूमी देखील भारताचीच आहे आणि देशाच्या नकाशात हे स्पष्टपणे दाखविले जाते, याकडे संरक्षण मंत्रालयाने लक्ष वेधले.

दरम्यान, भारताने एलएसीवर स्वीकारलेल्या आक्रमक धोरणामुळे चीनला या ठिकाणाहून माघार घ्यावी लागली, असे सांगून माजी लष्करी अधिकारी त्यावर समाधान व्यक्त करीत आहेत. आपल्या घुसखोरीवर भारताकडून इतकी तीव्र प्रतिक्रिया उमटेल, याचा विचार चीनने केलेला नव्हता. काही काळ या क्षेत्रात आपले जवान तैनात करून, भारतावर दडपण वाढवून त्यानंतर माघार घेण्याची तयारी चीनने केली होती. गलवानच्या खोर्‍यात हल्ला चढवून त्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण माघार घेत असल्याचे दाखविण्याचा चीनचा कट होता. पण भारतीय सैनिकांनी हे कारस्थान हाणून पाडले. या संघर्षात भारताचे २० सैनिक शहीद झाले तर चीनचे ४५ जवान ठार झाल्याची माहिती नुकतीच एका रशियन माध्यमांनी दिली होती.

यानंतरच्या काळात भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यानंतर चीनसमोर लडाखच्या एलएसीवरून आपली प्रतिष्ठा कायम ठेवून माघार कशी घ्यायची, हाच चीनसमोरील प्रश्‍न होता, असे माजी लष्करी अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे सहमती झाल्यानंतर चीनचे जवान या क्षेत्रातून वेगाने माघार घेत असल्याचे दिसू लागले आहे, याकडे माजी लष्करी अधिकारी लक्ष वेधत आहेत. दरम्यान, पँगाँग त्सो सरोवराच्या क्षेत्रातील माघारीचा प्रश्‍न सुटला तरी हॉटस्प्रिंग, गोग्रा व डेप्सांग इथूनही सैन्य माघारी घेण्यावर अद्याप सहमती झालेली नाही. येत्या ४८ तासात त्यावर उभय देशांच्या लष्करी अधिकार्‍यांची चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

leave a reply