चीनच्या आक्रमकतेमुळे भारताबरोबर संघर्ष उद्भवला

- लष्करप्रमुख जनरल नरवणे

भारताबरोबर संघर्षनवी दिल्ली – भारतीय लष्कर भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याची तयारी करीत असताना, सध्या देशाच्या सीमेवर निर्माण झालेल्या धोक्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी म्हटले आहे. लडाखच्या एलएसीवरून सैन्यमाघारीवर भारत व चीनची सहमती झालेली आहे. अशा काळात लष्करप्रमुखांनी हे विधान करून चीनवर विश्‍वास ठेवता येणार नाही, असा संदेश दिला आहे. त्याचवेळी चीनच्या आक्रमक कारवायांमुळे भारताबरोबर संघर्ष उद्भवल्याची टीका लष्करप्रमुखांनी केली.

गुरुवारी एका लष्करी अभ्यासगटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना लष्करप्रमुखांनी ईशान्येकडील सीमेच्या सुरक्षेला चीनकडून मिळत असलेल्या आव्हानांची जाणीव करून दिली. भारताच्या ईशान्येकडील सीमेवर चीन आक्रमक लष्करी हालचाली करीत आहे. त्याचवेळी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील छोट्या देशांना आपल्या गुंतवणूक व पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये अडकवित आहे. याद्वारे छोट्या देशांचे आपल्यावरील अवलंबित्त्व वाढवून चीन या क्षेत्रात असमतोल निर्माण करीत आहे. त्याचवेळी अमेरिका व चीनच्या स्पर्धेमुळेही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असमतोल निर्माण झालेला आहे, असे जनरल नरवणे म्हणाले.

भारताच्या शेजारी देशांमध्ये वाढत असलेल्या चीनच्या प्रभावापासून तसेच एलएसीवर एकतर्फी बदल करण्याच्या आक्रमक मानसिकतेमुळे चीनचे भारताबरोबरील संबंध ताणले गेले आहेत. यामुळे उभय देशांमध्ये संघर्षाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगून याला चीनची अतिमहत्त्वाकांक्षा जबाबदार असल्याचा ठपका जनरल नरवणे यांनी ठेवला. नेपाळ, भूतान या भारताच्या शेजारी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून चीन आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, याकडेही जनरल नरवणे यांनी लक्ष वेधले. चीनच्या ‘बीआरआय’ प्रकल्पाच्या मागेही हाच हेतू असल्याचा निर्वाळा भारताच्या लष्करप्रमुखांनी दिला.

दरम्यान, लडाखच्या एलएसीवरून चीनचे लष्कर माघार घेण्याची तयारी करीत आहे. असे असले तरी हा संघर्ष इथेच थांबणार नाही. चीन पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्यावाचून राहणार नाही, असे सामरिक विश्‍लेषक बजावत आहेत. भारतीय संरक्षणदलांनाही याची जाणीव असून लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी चीनबाबत केलेली विधाने याची साक्ष देत आहेत. पुढच्या काळातही भारतीय लष्कर चीनच्या घुसखोरी व इतर आक्रमक कारवायांना तितकेच सडेतोड प्रत्युत्तर देईल, असा संदेश जनरल नरवणे यांच्या विधानांद्वारे चीनला दिला जात आहे.

leave a reply