जम्मू काश्मीर मध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा दहशतवाद्यांपर्यंत ड्रोनद्वारे सीमेपलीकडून पोहोचविण्यात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जाते. या शास्त्रास्त्रांसह दोन दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे.

शस्त्रसाठा

जम्मू काश्मीरच्या पूंछमधून रविवारी मोठा शस्त्रसाठा पकडण्यात आला. दहशतवाद्यांच्या या छुप्या ठिकाणाबद्दल सुरक्षादलांना माहिती मिळाली होती. यानंतर लष्कर, पोलीस आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी ही संयुक्त कारवाई केली. यामध्ये चिनी बनावटीच्या पिस्तुलांसह, सहा मॅगझीन, ११ ग्रेनेड, वायरलेस सेट, आयईडी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजात ही शस्त्रे आणि स्फोटके पाकिस्तानातून आल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

पाकिस्तान ड्रोनद्वारे दहशतवाद्यांपर्यंत शस्त्रास्त्रे पोहचवीत असून दोन दिवसांपूर्वीही एक पाकिस्तानी ड्रोन सुरक्षादलांनी पाडले होते. ही शस्त्रेही सीमेपलीकडून ड्रोन मार्फ़त पोहचविण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जाते.

शस्त्रसाठादरम्यान, पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसविण्यासाठी टनेल्सचा वापर करीत असल्याचे , जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यात सीमा सुरक्षा दलाला(बीएसएफ) सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर १७० मीटर लांबीचे भुयार सापडले होते. २० ते २५ फूट खोल हे भुयार पाकिस्तानातून खोदण्यात आले होते. नुकतीच दिलबाग सिंग यांनी या टनेलची पाहणी केली. तसेच या परिसरात आणखी भुयारे आहेत का, याचा शोध घेतला जात आहे, असे दिलबाग सिंग म्हणाले.

जम्मूमध्ये दहशतवाद्यांचे हस्तक सक्रीय आहेत. या हस्तकांकडून जम्मू, सांबा आणि कथुआ जिल्ह्यातील भारतीय लष्करी ठिकाणे निशाण्यावर असल्याचे दिलबाग सिंग म्हणाले. पण या भागात अतिरिक्त जवानांची तैनाती करण्यात आली असून दहशतवाद्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.

leave a reply