भारतीय नौदलाच्या स्कॉर्पिन प्रवर्गातील ‘आयएनएस वागिर’चे जलावतरण

मुंबई – भारतीय नौदलाच्या ‘स्कॉर्पिन’ प्रवर्गातील पाचवी पाणबुडी ‘आयएनएस वागिर’चे गुरुवारी जलावतरण करण्यात आले. मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात, संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. ‘प्रोजेक्ट ७५’ अंतर्गत तयार करण्यात आलेली ही पाचवी पाणबुडी असून सहाव्या पाणबुडीची उभारणी सुरू आहे. येत्या वर्षभरात ‘आयएनएस वागिर’ भारतीय नौदलात सामील होईल, असा विश्वास नौदलाच्या ‘वेस्टर्न कमांड’चे प्रमुख आर. बी. पंडित यांनी यावेळी व्यक्त केला. जलावतरण कार्यक्रमाला वरिष्ठ नौदल अधिकारी तसेच फ्रान्सच्या ‘नॅव्हल ग्रुप’चे अधिकारीही हजर होते.

स्कॉर्पिन

फ्रेंच नौदलाच्या ‘स्कॉर्पिन क्लास’ पाणबुड्यांवर आधारलेल्या सहा पाणबुड्या तयार करण्याची जबाबदारी ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’वर सोपविण्यात आली होती. त्यातील ‘आयएनएस कलवरी’ व ‘आयएनएस खांदेरी’ या पाणबुड्या भारतीय नौदलात कार्यरत झाल्या असून ‘आयएनएस करंज’ व ‘आयएनएस वेला’ यांच्या सागरी चाचण्या सुरू आहेत. या दोन्ही पाणबुड्या येत्या काही महिन्यात नौदलात सामील होणार असल्याचे सांगण्यात येते. ‘हंटर किलर’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या या पाणबुड्या ‘अँटी वॉरशिप’ व ‘अँटी सबमरीन वॉरफेअर’ या दोन्हीची क्षमता असणाऱ्या आहेत. या पाणबुड्या गोपनीय माहिती मिळविणे, टेहळणी व सागरी सुरुंग पेरणे या जबाबदाऱ्याही सहजतेने पार पाडू शकतात.

डिझेल इलेक्ट्रिक प्रकारातील या पाणबुड्यांची लांबी २२० फूट असून, वेग २० नॉट्स इतका आहे. सागरी तळातून प्रवास करताना अत्यंत कमी आवाज हे या ‘स्कॉर्पिन क्लास’ पाणबुड्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. ‘टोर्पेडोज’ व ‘अँटी शिप मिसाईल्स’ने सज्ज असणाऱ्या या पाणबुड्यांवर भारताच्या ‘संरक्षण संशोधन व विकास संस्थे’ने(डीआरडीओ) विकसित केलेली ‘एअर इंडिपेंडंट प्रॉपल्जन सिस्टिम’ही तैनात करण्यात आली आहे.

भारताची सागरी किनारपट्टी साडेसात हजार किलोमीटर पसरलेली असून या किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाला अत्याधुनिक पाणबुड्यांची आवश्यकता असल्याची मागणी गेली काही वर्षे केली जात आहे. भारताचा शेजारी देश असलेल्या चीनकडे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे नौदल आहे. या चीनच्या नौदलात ७९ पाणबुड्या असून गेल्या काही वर्षांपासून सदर पाणबुड्यांची हिंदी महासागर, बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्र, या भारतीय सागरी क्षेत्रातील गस्त वाढली आहे. याव्यतिरिक्त चीन पाकिस्तानला आठ पाणबुड्या पुरविणार आहे.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या १७ पाणबुड्या आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय नौदलाला अत्याधुनिक पाणबुड्यांनी सज्ज करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती. या पार्श्वभूमीवरच काही महिन्यांपूर्वीच भारतीय नौदलाने स्टेल्थ पाणबुड्यांसाठी निविदा काढण्यात येत असल्याची माहिती दिली होती.

leave a reply