नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीतील गळतीने २४ जणांचा बळी घेतला

नाशिक – बुधवारी नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन महापालिका रुग्णालयात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. या रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टाकीतून गळती झाल्यानंतर ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाला आणि यामुळे रुग्णालयातील २४ रुग्णांचा बळी गेला. या दुर्घटनेने सारा देश हादरला आहे. राष्ट्रापती रामनाथ कोविंद, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही दुर्घटना अस्वस्थ करणारी असून बळींच्या नातलगांप्रती पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेवर शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांचे अर्थसहाय्य जाहीर केले. या भयंकर दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनानेे दरदिवशी सुमारे ५०० जणांचा बळी जात असून ६० हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. बुधवारीही महाराष्ट्रात ५६८ जणांचा बळी गेला, तर ६७ हजार नवे रुग्ण आढळले. या परिस्थितीमुळे राज्यातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सात लाखांवर पोहोचली आहे. रुग्णांसाठी बेडची उपलब्धता, ऑक्सिजनचा पुरवठा या आघाडीवर आरोग्य यंत्रणांना मोठा ताण सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात हादरून टाकणारी दुर्घटना नाशिकमधील कोविड सेंटर असलेल्या महापालिका रुग्णालयात घडली आहे.

बुधवारी सकाळी नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या मुख्य टाकीच्या वॉलमधून ऑक्सिजनची गळती होत असल्याचे लक्षात आले. यानंतर हा वॉल दुरुस्त करून ही गळती थांबविण्याचा प्रयत्न करीत असतानाच हा तडे गेलेला वॉल तुटला. त्यामुळे टाकीतील लिक्विड ऑक्सिजनची पूर्ण गळती झाली. यावेळी रुग्णालयात १५० रुग्ण ऑक्सिजनवर, तर काही रुग्ण व्हेंटिलेटरवर होतेे. ऑक्सिजन टाकीचा वॉल पुढील अर्धा ते पाऊण तासात दुरुस्त करण्यात आला. तसेच तातडीने ऑक्सिजन मागवून येथे पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने रुग्णालयातील २४ रुग्णांचा गुदमरुन दुर्देवी मृत्यु झाला.

त्यानंतर रुग्णालयाचा परिसर बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांच्या आक्रोशाने हादरून गेला. याशिवाय रुग्णालयात भरती असलेल्या इतर रुग्णांच्या नातेवाईकांनीही रुग्णालयाकडे धाव घेतली. तसेच नवे रुग्ण येणे सुरू असल्याने रुग्णालयात मोठा गोंेधळ उडाला. घटनेचे वृत्त प्रसिद्ध होताच देश हादरून गेला. रुग्णालयात ऑक्सिजन टाकीची देखभाल करण्यासाठी तंत्रज्ञ उपस्थित नव्हता, असे समोर आले आहे. महाराष्ट्र सरकारने या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शासन केले जाईल, असे म्हटले आहे.

दरम्यान, बिडच्या आंबेजोगाईमध्येही एका रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा खंडीत झाल्याने सहा जण दगावल्याचे वृत्त आहे. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून यासाठी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. रुग्णालय प्रशासनाने हा आरोप फेटाळला आहे.

leave a reply