अमेरिकेतून आयात केलेल्या दांभिक डाव्या विचारसरणीमुळे फ्रान्समध्ये तेढ वाढली – राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी बजावले

पॅरिस/वॉशिंग्टन – अमेरिकेतून आयात केलेली दांभिक डावी विचारसरणी फ्रान्सला कट्टरतेकडे घेऊन चालली असून फ्रेंच समाजात फूट पाडून तेढ वाढत चालली आहे, असा घणघाती प्रहार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केला. या विचारसरणीने फ्रान्समधील वांशिक अल्पसंख्य समुदायांना नजरकैदेत टाकले असून त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे, असेही राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी बजावले. गेल्या सहा महिन्यात मॅक्रॉन यांनी डाव्या विचारसरणीविरोधात आक्रमक शब्दात टीकास्त्र सोडण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यांच्या या भूमिकेला फ्रेंच जनतेकडून चांगले समर्थन मिळत असल्याचे समोर येत आहे.

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी ‘एले’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दांभिक डाव्या विचारसरणीविरोधात जबरदस्त प्रहार केले आहेत. ‘फेमिनिस्ट गट व कृष्णवर्णियांसाठी काम करणार्‍या संघटना प्रत्येकाला लिंग व वर्णावरून लक्ष्य करीत आहेत. अशाने फ्रेंच समाजात फूट पडत आहे व वांशिक अल्पसंख्य समुदायामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे’, असा आरोप फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी केला. सामाजिक पातळीवर असणार्‍या अडचणींमागे फक्त लिंग व वर्ण कारणीभूत नसते, तर त्यामागे इतर सामाजिक असमानतेचाही वाटा असतो असा दावा मॅक्रॉन यांनी यावेळी केला.

फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षात डावे गट व युवा वर्ग विविध मुद्यांवर अत्यंत आक्रमकतेने व्यक्त होत असल्याचे समोर आले आहे. ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’च्या समर्थनार्थ झालेली आंदोलने तसेच ‘यलो वेस्ट’ निदर्शनांमधून ही बाब दिसून आली होती. फ्रान्समधील विविध शिक्षणसंस्थांमध्ये फ्रेंच परंपरा व इतिहासाला आव्हान देऊन वर्णवादी विचारसरणीचा पुरस्कार केला जात आहे. फ्रेंच परंपरांचे समर्थन करणार्‍या विचारवंतांना बहिष्कृत करण्याची प्रकरणेही समोर आली आहेत.

या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी या सर्व प्रकाराला लक्ष्य करीत त्यामागे अमेरिकेतून आयात झालेली दांभिक डावी विचारसरणी असल्याचा उघड आरोप केला आहे. त्यांच्या या भूमिकेला फ्रान्समधील उजव्या गटांकडून तसेच विचारवंतांकडूनही समर्थन मिळाल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. फेब्रुवारी महिन्यात फ्रान्समधील 100हून अधिक विचारवंतांनी एक खुले पत्र जारी केले होते. या पत्रात, अमेरिकेतून येणारी दांभिक डावी विचारसरणी व बहिष्काराची संस्कृती फ्रान्सच्या अस्तित्वासाठी धोका ठरु शकते, असे बजावण्यात आले होते.

leave a reply