लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख बनणार

लेफ्टनंट जनरल मनोज पांडेनवी दिल्ली – सध्या लष्कराच्या ईस्टर्न कमांडचे नेतृत्त्व करणारे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख बनणार आहेत. सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांचा कार्यकाळ ३० एप्रिल रोजी पूर्ण होणार असून १ मे पासून मनोज पांडे भारताच्या लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारतील. यामुळे पहिल्यांदाच इंजिनिअर असलेेले लष्करप्रमुख मिळतील.

२००१ साली देशाच्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरच्या सीमेवर ऑपरेशन पराक्रम सुरू करून पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला जबरदस्त प्रत्युत्तर देण्यासाठी मोहीम राबविली होती. या ‘ऑपरेशन पराक्रम’मध्ये सध्याचे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी फार मोठी भूमिका पार पाडली होती. यावेळी भारतीय लष्कराच्या हालचालींमुळे दडपण वाढलेल्या पाकिस्तानने पुढच्या काळात भारतविरोधी दहशतवाद्यांना आपल्या भूमीत थारा देणार नाही, असे मान्य केले होते.

दरम्यान, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे सध्या लष्कराच्या ईर्स्टन कमांडचे नेतृत्त्व करीत आहेत. सिक्कीम व अरुणाचल प्रदेशच्या एलएसीची जबाबदारी त्यांच्या असून चीनबरोबरील तणाव वाढलेला असताना, या क्षेत्रात लष्कराचे नेतृत्त्व करून त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. याच्या आधी अंदमान निकोबार कमांडचे प्रमुख म्हणूनही लेफ्टनंट जनरल मनोज पांड यांनी काम पाहिले होते.

इथिओपिया आणि इरिट्रिया या देशांमधील भारतीय लष्कराच्या मोहिमेची जबाबदारीही त्यांनी पार पाडलेली आहे. परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, देशाचे पहिले संरक्षणदलप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर हे पद रिक्त झालेले आहे. त्यावर सध्याचे लष्करप्रमुख जनरल नरवणे यांची नियुक्त होईल का, अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू झालेली आहे. मात्र याबाबतची घोषणा किंवा संकेत अद्याप केंद्र सरकारकडून देण्यात आलेले नाहीत.

leave a reply