सोव्हिएत युनियनप्रमाणेच युरोपिय महासंघाचीही अखेर होईल

हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांचा दावा

European Unionबुडापेस्ट – ‘कशाच्यातरी आडून किंवा ब्रुसेल्समधून गोळ्या झाडणाऱ्यांकडे जास्त लक्ष देऊ नका. त्यांच्या पूर्वजांची जिथे अखेर झाली तशीच यांचीही होईल. आक्रमक साम्राज्यांनी ज्यावेळी पहिल्यांदा आपल्यावर हल्ले केले तेव्हा आपण याच जागी होतो. जेव्हा आक्रमण करणारे शेवटचे साम्राज्यही कोसळेल त्यावेळीही हंगेरीची जनता इथेच पाय रोवून असणार आहे. संकटे सहन करण्याची वेळ असेल तेव्हा ती सहनशक्ती आपण दाखवू आणि संकटांना धक्का द्यायच्या वेळेस त्यांना मागेही लोटण्यात यशस्वी होऊ. संधी मिळेल तेव्हा तलवारीही बाहेर निघतील. दडपशाहीचा दीर्घकाळ प्रतिकार करण्यासाठी आपण सक्षम आहोत’, अशा शब्दात हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी युरोपिय महासंघावर घणाघाती टीका केली.

European Union will also endगेल्या शतकात हंगेरीत सोव्हिएत युनियन ऑफ रशियाची कम्युनिस्ट राजवट होती. या राजवटीविरोधात हंगेरीच्या जनतेने १९५६ साली उठाव केला होता. हंगेरीत झालेल्या या उठावाची आठवण म्हणून रविवारी हंगेरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यातील एका कार्यक्रमात, पंतप्रधान ऑर्बन यांनी युरोपिय महासंघाची तुलना सोव्हिएत युनियनच्या राजवटीशी केली. यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात हंगेरीला निर्वासितांचे लोंढे तसेच आर्थिक मंदीसारख्या संकटांना तोंड द्यावे लागणार असल्याची जाणीवही करून दिली. हंगेरीचे सरकार एकजुटीने काम करीत असून संकटांना तोंड देण्यास सक्षम आहे व देशाच्या जनतेनेही त्याला साथ द्यावी, असे आवाहनही ऑर्बन यांनी यावेळी केले.

गेल्या काही वर्षांपासून हंगेरी व युरोपिय महासंघादरम्यान सातत्याने खटके उडत आहेत. निर्वासितांच्या मुद्यासह महासंघाच्या अनेक धोरणांना पंतप्रधान ऑर्बन यांनी विरोध केला आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळातही हंगेरीच्या पंतप्रधानांनी महासंघाने लादलेल्या निर्बंधांवर टीका केली आहे. महासंघाकडून युक्रेनच्या सहाय्यासाठी घेण्यात येणारे निर्णय युद्धाला अधिक चिथावणी देणारे असल्याचा ठपकाही हंगेरीने ठेवला आहे.

hungary_Pratyaksha 1हंगेरीकडून सातत्याने घेण्यात येणाऱ्या विरोधी भूमिकेमुळे महासंघाने या देशावर कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महासंघाकडून या देशाला देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याचा काही भाग रोखून धरण्यात आला आहे. अर्थसहाय्य हवे असेल तर महासंघाला अनुकूल निर्णय घ्यावेत तसेच महासंघाच्या चौकटीत काम करावे यासाठी दडपण आणले जात आहे. हंगेरीने भ्रष्टाचारासह काही मुद्यांवर महासंघाला अनुकूल निर्णय घेतले असले तरी महासंघाच्या मागण्या सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे ऑर्बन यांनी आता उघडपणे महासंघाविरोधात संघर्ष छेडण्याचे संकेत दिले आहेत.

युरोपिय महासंघाची तुलना सोव्हिएत युनियनशी करून त्याची अखेर होण्याबाबत केलेला दावा त्याचाच भाग ठरतो. यापूर्वी ऑर्बन यांनी महासंघाबरोबरच अमेरिकेवरही आरोप केले होते. अमेरिकेतील प्रशासन हंगेरीतील आपले सरकार उलथण्याचे प्रयत्न करत असल्याचे ऑर्बन यांनी म्हटले होते.

leave a reply