नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसची साथ रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र यामुळे हातावर पोट असलेल्या मजुरांची अवस्था बिकट बनली असून हे मजूर आता पायीच आपल्या राज्यात परतू लागले आहेत. याने नवे संकट खडे ठाकले आहे. काही राज्यांच्या सीमेवर मजुरांची तुफान गर्दी झाली आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना या मजुरांना जागीच थांबिवण्यास सांगितले आहे. तसेच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा असे निर्देश राज्यांना दिले आहेत. तसेच असा प्रवास करून येणाऱ्यांना काही दिवस वेगळे ठेवा अशा सूचना केल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे देशभरातील व्यवहार ठप्प झाले असून मजुरांचे कामही थांबले आहे. यामुळे मजुर आपल्या गावी परतू लागले आहेत. यामुळे काही राज्यांच्या सीमेवर गर्दी झाली आहे. त्यातच कोरोनाची लागण झालेल्या दुसऱ्या कुणालाही आपल्या राज्यात येऊ न देण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. पण पायीच आपल्या घराकडे निघालेल्या मजुरांच्या गर्दीमुळे कोरोनाव्हायरसची तीव्रता अधिकच वाढण्याची भयावह शक्यता व्यक्त करण्यात येत. या स्थलांतरित मजुरांबरोबर कोरोनाव्हायरसची साथ गावापर्यंत पोहोचली तर परिस्थिती बिघडू शकते, याचा अंदाज आलेल्या केंद्र सरकार व राज्यसरकारांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
केंद्र सरकारने रविवारी सर्व राज्य सरकारांना अशा स्थलांतरित मजुरांना आहे तेथेच रोखावे व त्यांच्या राहण्याची व खाण्याची व्यवस्था करावी असे निर्देश दिले. यासाठी राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमा बंद करा असा आदेश दिला आहे. तसेच या मजुरांना तुम्ही जेथे आहात तेथच थांबा असे आवाहन केले आहे. असे स्थलांतरण केलेल्याना काही दिवस वेगळे ठेवण्यात यावे अशा सूचनाही केल्या आहेत.
दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर गावी परतणाऱ्या अशा स्थलांतरित मजुरांची हजारोंच्या संख्येने गर्दी झाली आहे. संबंधित यंत्रणांकडून त्यांची वैद्यकीय तपासणी, त्यांच्या निवाऱ्याची, अन्नपाण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या मजुरांना या आवश्यक गोष्टी पुरविणे या यंत्रणासाठी मोठे आव्हान ठरत आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारांनी या मजूरांसाठी बसची व्यवस्था केली आहे. काही बस इथून निघाल्या असून बसमध्येही मजुरांची प्रचंड गर्दी दिसत आहे.
दरम्यान शुक्रवारी रात्री हैद्राबादमधून निघालेल्या मजूरांचा अपघात होऊन आठ मजुरांचा मृत्यू झाला तर शनिवारी सकाळी मुंबई-अहमदाबाद मार्गावर झालेल्या अपघातात चार जण मृत्यूमुखी पडले.