इटलीमध्ये कोरोनाव्हायरसचे १० हजारांहून अधिक बळी

रोम/माद्रिद/वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाव्हायरसने ३२ हजाराहून अधिक जणांचा बळी घेतला असून एकट्या इटलीमध्ये या साथीने १० हजाराहून अधिक जण दगावले आहेत. इटली आणि स्पेन या दोन युरोपिय देशांमध्ये सर्वाधिक बळी जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. दरम्यान, अमेरिकेत एका दिवसात १९ हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त आढळल्यामुळे नवी खळबळ उडाली आहे.

कोरोनाव्हायरसच्या साथीचे तपशील देणार्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील प्रत्येक देश या महामारीच्या कचाट्यात सापडला आहे. या साथीत एकूण ३२,१८२ जण दगावले असून कोरोनाग्रस्तांची संख्या ६,८४,८२५ वर गेली आहे. युरोपिय देशांमध्ये २१,४९६ जणांचा बळी गेला तर ३,६१,४५७ जण संक्रमित झाले आहेत. सध्या या साथीचे केंद्र ठरत असलेल्या इटलीमध्ये एका दिवसात ८८९ जणांचा बळी गेला आणि जवळपास सहा हजार नवे रूग्ण सापडले आहेत.

गेल्या चोवीस तासात स्पेनमध्ये ८३८ जण दगावले असून ६५४९ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी स्पेनच्या राजकुमारी मारिया तेरेसा दगावल्या असून स्पेनवर शोककळा पसरली आहे. स्पेनच्या शेजारी असलेल्या फ्रान्समध्ये एका दिवसात ३१९ बळी गेले तर ४६११ नव्या रुग्णांना याची लागण झाली आहे. इटली, स्पेननंतर फ्रान्समध्ये देखील रुग्णालयात कोरोनाग्रस्तांना जागा मिळणे अवघड बनत चालले आहे. तसेच अधिकृत पातळीवर जाहीर होणार्या माहितीपेक्षा अधिक जणांचा बळी गेल्याची शक्यता फ्रान्समधील माध्यमे व्यक्त करीत आहेत.

ब्रिटनमध्ये शनिवारी २०९ जणांचा बळी गेला असून या साथीत दगावणार्यांची ब्रिटनमधील संख्या एक हजारावर गेली आहे. तर या साथीने संक्रमित झालेल्यांची संख्या वीस हजाराजवळ पोहोचली आहे. अमेरिकेत गेल्या चोवीस तासात या साथीने ३१९ जणांचा बळी घेतला. तर याच कालावधीत १९,४५२ नवे संक्रमित रूग्ण आढळले आहेत. सलग दोन दिवस अमेरिकेत पंधरा हजाराहून अधिक रूग्ण सापडत असल्यामुळे खळबळ उडाली आहे.

अमेरिका दरदिवशी जवळपास एक लाख नागरिकांची तपासणी करीत असून यामुळे रुग्ण सापडण्याचा वेग देखील अधिक असल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply