इजिप्तच्या लष्कराची सिनाईत मोठी कारवाई

- 89 दहशतवाद्यांचा खातमा

सिनाईकैरो – इजिप्तच्या लष्कराने सिनाई प्रांतात दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत 89 दहशतवादी ठार झाले. इजिप्तच्या लष्करानेच याची माहिती दिली. या संघर्षात आपले आठ जवानही मारले गेल्याचे इजिप्तच्या लष्कराने स्पष्ट केले. त्याचबरोबर सिनाई प्रांत आणि गाझापट्टीला जोडणारे 13 भुयारीमार्ग उद्ध्वस्त केल्याचे लष्कराने जाहीर केले आहे.

रेड सी आणि भूमध्य समुद्राला विभागणारा इजिप्तच्या सिनाई द्विपकल्पावर तळ ठोकणार्‍या दहशतवाद्यांविरोधात लष्कराकडून कारवाई केली जाते. सिनाईतील शरणार्थी पॅलेस्टिनींच्या आड ‘आयएस’ तसेच हमासचे दहशतवादी लपून असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे इजिप्त तसेच इस्रायलच्या सुरक्षेसाठी सिनाईतील लष्करी कारवाईला महत्त्व दिले जाते.

इजिप्तच्या लष्कराने रविवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, सिनाईतील ‘आयएस’च्या दहशतवाद्यांवर नुकतीच कारवाई केली गेली. या कारवाईत ‘आयएस’च्या 89 दहशतवाद्यांना ठार केल्याचे इजिप्तच्या लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. त्याचबरोबर दहशतवाद्यांकडील 404 आयईडी स्फोटके, आत्मघाती स्फोटांसाठी तयार केलेले चार बेल्ट्स आणि 13 भुयारीमार्ग नष्ट केले.

इजिप्तमध्ये घुसखोरीसाठी या भुयारीमार्गांचा वापर केला जात होता, अशी माहिती लष्कराने दिली. पण या लष्करी कारवाईचा दिवस सांगण्याचे इजिप्तच्या लष्कराने टाळले.

2018 सालच्या फेब्रुवारी महिन्यात इजिप्तच्या लष्कराने सिनाई प्रांतात आयएसविरोधात कारवाई सुरू केली होती. या संघर्षात 1060 दहशतवादी ठार झाले असून किमान शंभर जवानांचा देखील यात बळी गेला आहे. इजिप्तच्या लष्कराने ‘आयएस’ तसेच इतर दहशतवादी संघटनांविरोधात सुरू केलेल्या या कारवाईवर स्थानिक मानवाधिकार संघटना व माध्यमे टीका करीत आहेत.

leave a reply