स्वातंत्र्यदिनाआधी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला – ड्रोनद्वारे तस्करी केलेले टिफीन आयईडी आणि ग्रेनेड जप्त

ग्रेनेड

अमृतसर/श्रीनगर – स्वातंत्र्यदिनाआधी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळण्यात आला. पंजाबच्या अमृतसरमधील आंतरराष्ट्रीय सीमा रेषेवरील गावात मोठा शस्त्र व स्फोटकसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये ‘आरडीएक्स’ने भारलेला टिफीन आयईडीसह ग्रेनेड, पिस्तूल आणि काडतूसांचा समावेश आहे. ही शस्त्र व स्फोटके पाकिस्तानातून ड्रोनद्वारे येथे टाकण्यात आली असावीत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणात केंद्रीय तपास व सुरक्षा यंत्रणांबरोबर समन्वयाने काम करण्यात येत असल्याची माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी दिली.

अमृतसरमध्ये अगदी सीमेवर असलेल्या दालेक गावात हा स्फोटक व शस्त्रसाठा सापडला. गावाच्या सरपंचाने प्रथम एक संशयीत बॅग दिसून आल्याची सूचना पोलिसांना दिली. ७ आणि ८ ऑगस्ट रोजी रात्री या गावातील नागरीकांनी ड्रोनचा आवाज ऐकला होता. त्यामुळे संशयित स्थिती एक बॅग दिसतात ताबडतोब पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पंजाब पोलिसांनी नॅशनल सिक्युरिटी गार्डला (एनएसजी) याबाबत सूचित केले.

एनएसजीच्या पथकाने सोमवारी रात्री उशीरा पकडण्यात आलेला टिफीन आयईडी निकामी केला. डबल खाण्याच्या प्लॅस्टिकच्या टिफीनमध्ये हा रिमोट आयईडी बसविण्यात आला होता. तसेच या ठिकाणी पाच ग्रेनेडही सापडले. याशिवाय ९ एमएम पिस्तूलाची १०० काडतूसे आणि इतरही काही साहित्य जप्त करण्यात आले. टिफीन आयईडीमध्ये दोन ते तीन किलो आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता, असे पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले.

ग्रेनेडपाकिस्तानातून आलेल्या ड्रोनद्वारे ही स्फोटके व शस्त्रे येथे टाकण्यात आली असावीत असे पोलिसांनी म्हटले हा स्फोटक व शस्त्रसाठी कोणासाठी पुरविण्यात आला होता. तसेच याद्वारे कोणला लक्ष्य करण्यात येणार होते याचा तपास सुरू आहे. यासाठी केंंद्रीय यंत्रणांशी सातत्याने संपर्कात असल्याची माहितीही पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी दिली.

गेल्या तीन महिन्यात सीमेपलिकडील हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे सीमाभागातील नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरते. स्टिकर लावलेल्या लहान मुलांच्या प्लास्टिकच्या डब्यात आयईडीही बसविण्यात आला होता, यावरून निष्पाप नागरिकांना लक्ष्य करण्याची योजना होती, हे स्पष्ट होते, असेही पोलीस महासंचालक गुप्ता म्हणाले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ही स्फोटके सापडली आहेत. त्यामुळे १५ ऑगस्ट किंवा त्याआधी मोठा हल्ला घडविण्याची दहशतवादी संघटनांची योजना असू शकते. यामुळे पंजाबमध्ये हाय ऍलर्ट देण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा शस्त्र व स्फोटकसाठा पकडला

जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील सनगड गावातील जंगल क्षेत्रातही मोठा शस्त्र व स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. दहशतवाद्यांचा छुपा तळ सुरक्षादलांनी उद्ध्वस्त केला. यामध्ये दोन एके-४७ रायफली, चार एके मॅगझीन, एके-४७ ची २५७ काडतूसे, चायनिज पिस्तूल, पिस्तूलची १० मॅगझीन, एक वायरलेस सेट, चार चिनी बनावटीचे हॅण्डग्रेनेड, ९ एमएम गनची ६८ काडतूसे, दोन मोबाईल फोन, ९ बॅटरी, वायर व इतर साहित्याचा समावेश आहे. तर दुसर्‍या एका घटनेत हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

तसेच सोमवारी जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये एका राजकीय नेत्याची व त्याच्या पत्नीचीही दहशतवाद्यांनी गोळी घालून हत्या केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पंचायत निवडणुकीतही गुलाम रसूल दार हे निवडून आले होते. दहशतवाद्यांकडून सातत्याने लोकप्रतिनिधी व स्थानिक नेते लक्ष्य बनविण्यात येत आहेत. सुरक्षादलांच्या कारवाईमुळे हतबल झालेले दहशतवादी सोपे लक्ष्य निवडत असून लोकप्रतिनिधींना लक्ष्य करुन पुन्हा काश्मीरमध्ये दहशतवाद माजविण्यासाठी धडपडत असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

 

leave a reply