साऊथ चायना सी क्षेत्रात मलेशियाच्या विनाशिका, पाणबुडीतून क्षेपणास्त्रांच्या चाचण्या

विनाशिकाकौलालंपूर – मलेशियाच्या नौदलाने ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात विनाशिका आणि पाणबुडीवरुन क्षेपणास्त्रे डागून दुर्मिळ प्रात्यक्षिके सादर केली. या क्षेपणास्त्रांनी अचूक लक्ष्य भेदून मलेशियन नौदल आपल्या सागरी हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचा संदेश दिला आहे. मलेशियाच्या नौदलाने उघडपणे कुठल्याही देशाचे नाव घेण्याचे टाळले. पण दोन महिन्यांपूर्वी साऊथ चायना सीच्या क्षेत्रातील चीनच्या घुसखोरीवर मलेशियाने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे मलेशियन नौदलाची ही कारवाई चीनला संदेश देण्यासाठी असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, आठवड्यापूर्वी अमेरिकेने आयोजित केलेल्या युद्धसरावात मलेशियाच्या नौदलाने सहभागघेतला होता.

मलेशियाच्या नौदलाचा ‘तामिंग सरी’ सराव नुकताच पार पडला. या सरावात मलेशियन नौदलाने तीन ‘एक्सोसेट’ क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली. ‘केडी कस्तूरी’ आणि ‘केडी लेकिर’ या दोन कस्तूरी श्रेणीतील विनाशिकांमधून ‘एक्सोसेट एमएम40 ब्लॉक टू’ क्षेपणास्त्रे डागली. शत्रूप्रदेशातील ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी या क्षेपणास्त्रांचा वापर केला जातो. तर ‘केडी तुन रझाक’ या स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुडीतून ‘एक्सोसेट एसएम39 ब्लॉक टू’ या विनाशिकाभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. पाणबुडी पाण्याखाली असताना क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले, अशी माहिती मलेशियाच्या नौदलाने दिली.

विनाशिका‘या चाचणीत तीनही क्षेपणास्त्रांनी अचूकरित्या आपले लक्ष्य भेदले. यावरुन मलेशियन नौदलाची व्यावसायिकता, सामर्थ्य आणि कुठल्याही तैनातीसाठी आवश्‍यक सज्जता दिसून येते. तसेच आपण देशाच्या सागरी हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी तयार असल्याची घोषणा मलेशियाच्या नौदलाने केली. साऊथ चायना सीच्या क्षेत्रात पार पडलेल्या या सरावात मलेशियाच्या संरक्षणदलांचे किमान हजार जवान सामील झाले होते.

मलेशियाच्या नौदलाने घेतलेल्या या क्षेपणास्त्र चाचणींबाबत सांगताना ‘साऊथ चायना सी’वर अधिकार सांगणाऱ्या चीनचा थेट उल्लेख टाळला. असे असले तरी मलेशियन नौदलाची ही क्षेपणास्त्र चाचणी चीनविरोधी असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये साऊथ चायना सीच्या वादावरुन चीन आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये निर्माण झालेला वाद यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

विनाशिकाजून महिन्यात चीनच्या 16 लष्करी विमानांनी साऊथ चायना सीच्या क्षेत्रातून प्रवास करीत मलेशियाच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली होती. मलेशियाच्या बोर्नो प्रांताच्या हद्दीपर्यंत चिनी विमानांनी धडक मारली होती. याची गंभीर दखल घेऊन मलेशियाने आपली लढाऊ विमाने रवाना करून चीनच्या घुसखोरी विमानांना पिटाळून लावले. तसेच चिनी राजदूतांना समन्स बजावले होते.

चीनबरोबर मैत्रीपूर्ण सहकार्य असले तरी मलेशिया आपल्या सुरक्षेशी तडजोड करील, असा गैरसमज करून घेऊ नका, असा इशारा मलेशियाने दिला होता. एरवी साऊथ चायना सीच्या वादात संयमी भूमिका घेणाऱ्या मलेशियाने चीनविरोधात स्वीकारलेल्या भूमिकेवर विश्‍लेषकांनी भुवया उंचावल्या होत्या.

दरम्यान, सॅटेलाईट आणि सागराच्या तळाशी बसविलेल्या यंत्रणेच्या सहाय्याने चीन साऊथ चायना सीच्या क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या क्षेत्रीय तसेच परदेशी जहाजांची हेरगिरी करीत असल्याची माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत, मलेशियाने विनाशिका आणि पाणबुडीतून क्षेपणास्त्रांची घेतलेली चाचणी महत्त्वाची ठरते.

leave a reply