भारतावर कुरघोडी करू पाहणाऱ्या चीनला मालदीव व ऑस्ट्रेलियाचा धक्का

बीजिंग – २१ नोव्हेंबर रोजी ‘चायना-इंडियन ओशन रिजन फोरम’ची बैठक आयोजित केली होती. हिंदी महासागर क्षेत्रातील १९ देश या बैठकीत सहभागी झाल्याचा दावा चीनने केला होता. मात्र यात भारताचाच समावेश नव्हता. पण चीनच्या या बैठकीत आपले अधिकृत प्रतिनिधी नव्हते, असे मालदीवने जाहीर केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने देखील या परिषदेत आपला सहभाग नव्हता, असे जाहीर करून चीनला धक्का दिला आहे. मालदीव आणि ऑस्ट्रेलियाने हा खुलासा केल्यानंतर, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

IndianOceanRegionForumहिंदी महासागर क्षेत्र म्हणजे भारताचे अंगण नाही, असा दावा चीनकडून केला जातो. त्यावर चीनचाही अधिकार असल्याचे या देशाचे म्हणणे आहे. यासाठीच चीनने या सागरी क्षेत्रातील आपल्या नौदलाच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. मात्र भारताच्या हिंदी महासागर क्षेत्रातील नैसर्गिक प्रभावाला आव्हान देण्यात अजूनही चीनला फारसे यश मिळालेले नाही. अशा परिस्थितीत चीन या सागरी क्षेत्रातील देशांना आपल्या बाजूने वळून भारताला घेरण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. २१ नोव्हेंबर रोजी ‘चायना-इंडियन ओशन रिजन फोरम’चे आयोजन हा चीनच्या याच प्रयत्नांचा भाग ठरतो.

या क्षेत्रातील सुमारे १९ देश सदर बैठकीत सहभागी झाल्याचा दावा चीनने केला होता. यात मालदीव व ऑस्ट्रेलियाचाही समावेश असल्याचे चीनने जाहीर केले होते. मात्र मालदीवने आपले अधिकृत प्रतिनिधी या बैठकीत नव्हते, असे जाहीर केले. त्याच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाने देखील या बैठकीत आपल्या देशाचा अधिकृत प्रतिनिधी नव्हता, असे बजावले आहे. मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद वाहिद हसन व ऑस्ट्रेलियाचे माजी राष्ट्राध्यक्ष केविन रूड या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांचा वापर करून मालदीव आणि ऑस्ट्रेलिया देखील या बैठकीत सहभागी झाल्याचे चित्र चीनने रंगविले होते. पण आता या देशांकडून खुलासा आल्यानंतर चीनला धक्का बसल्याचे दिसत आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर न देता बगल दिली. पण यामुळे चीन हिंदी महासागर क्षेत्रात आपला प्रभाव असल्याचे दाखविण्यासाठी उतावीळ झाल्याचे नव्याने समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी चीनच्या एका विश्लेषकाने हिंदी महासागर क्षेत्रात चीनचे नौदल आपला प्रभाव वाढविण्यासाठी हालचाली करणार असल्याचा दावा केला. इतकेच नाही, तर चिनी नौदलाच्या या कारवायांसाठी भारताने सज्ज रहावे, असे आव्हान देखील या विश्लेषकाने दिले होते. पण हिंदी महासागर क्षेत्रात भारताला आव्हान देणे सोपे नाही, याची पुरेपूर जाणीव चीनला आहे. केवळ आपल्या नौदलाची जहाजे व पाणबुड्या पाठवून चीन आपण भारताच्या विरोधात काहीतरी करून दाखवित असल्याचा संदेश या क्षेत्रातील देशांना देऊ पाहत आहे.

या सागरी क्षेत्रातील छोट्या देशांचा चीनपेक्षा भारतावरच अधिक विश्वास आहे. भारत आपल्या सार्वभौमत्त्वावर व हितसंबंधांवर हल्ले चढविणार नाही, याची खात्री या देशांना आहे. मात्र चीनवर असा विश्वास ठेवता येणार नाही, याची सुस्पष्ट जाणीव या सागरी क्षेत्रातील छोट्या देशांना झालेली आहे. म्हणूनच भारताकडून हिंदी महासागर व त्याच्याही पलिकडे जाणाऱ्या क्षेत्रातील देशांच्या बैठकीचे आयोजन केल्यानंतर, त्याला फार मोठा प्रतिसाद मिळतो. असाच प्रतिसाद आपल्याला देखील मिळत असल्याचे चीन जगाला दाखवू पाहत आहे. पण ‘चायना-इंडियन ओशन रिजन फोरम’मध्ये आपला सहभाग नव्हता, हे जाहीर करून मालदीव व ऑस्ट्रेलियाने चीनच्या योजनांना सुरूंग लावला आहे.

leave a reply