‘मंगळयान-२’ ऑर्बिटर मोहीम असेल

- इस्रोचे प्रमुख के. सिवन

नवी दिल्ली – नासाने मंगळवार पाठविलेला रोव्हर मंगळच्या पृष्ठभागावर नुकताच उतरला. त्याचवेळी भारताने आपल्या दुसर्‍या मंगळयान मोहिमेची घोषणा केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी शनिवारी एका मुलाखतीत भारतही दुसरे मंगळयान मिशन आखणार आहे. मात्र ही मोहिम केवळ ऑर्बिटर मोहिम असेल, असे सिवन यांनी स्पष्ट केले. तसेच या दुसर्‍या मंगळयान मोहिमेेचा कालावधी अद्याप निश्‍चित झालेला नाही, असेही सिवन म्हणाले.

सध्या इस्रोकडून चंद्रयान-३ मोहिमेकडे लक्ष पुरविण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे ही मोहिम लांबणीवर पडली होती. २०१९ सालात आखण्यात आलेल्या चंद्रयान-२ मोहिमेला पुर्ण यश मिळाले नव्हते. या मोहिमत ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत व्यवस्थित काम करीत असला, तरी याच मोहिमत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी पाठविण्यात आलेला विक्रम लॅण्डर आणि प्रग्यान रोव्हरचा संपर्क मात्र तुटला होता. त्यामुळे चंद्राच्या दक्षिणी अंधार्‍या पृष्ठभागावर रोव्हर उतरवून आवश्यक माहिती गोळा करण्याची मोहिम अपयशी ठरली होती.

मात्र त्याचवेळी इस्रोने चंद्रयान-३ ची घोषणा केली होती. या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर पाठविण्याचा प्रयोग पुन्हा एकदा करण्यात येणार आहे. मात्र या मोहिमेला २०२२ साल उजाडेल, असे वृत्त आहे. त्यामध्ये अमेरिकेच्या नासाने नुकताच मंगळावर रोव्हर उतरविला आहे. या पार्श्‍वभूमीवर इस्रोही मंगळावर रोव्हर पाठविणार का? असा प्रश्‍न इस्रोचे प्रमुख के. सिवन यांना विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना इस्रो दुसरी मंगळ मोहिम राबविणार असल्याचे सिवन यांनी जाहीर केले. मात्र चंद्रयान-३ नंतरच ही मोहिम राबविण्यात येईल. तसेच मंगळयान-२ ही केवळ ऑर्बिटर मोहिम असेल. मंगळाच्या कक्षेत ऑर्बिटर पाठविला जाईल आणि ऑर्बिटर मंगळाभोवती फिरुन माहिती मिळवेल, असे सिवन म्हणाले.

याआधी २०१३ साली पहिली मंगळयान मोहिम राबविण्यात आली होती आणि सप्टेंबर २०१४ मध्ये हे मंगळयान मंगळाच्या कक्षेत पोहोचले होते. मंगळयान ऑर्बिटर केवळ ६ महिने काम करण्याच्या दृष्टीने बनविण्यात आला होता. मात्र आता सात वर्ष उलटल्यावरही तो व्यवस्थित काम करीत आहे. केवळ ४५० कोटी रुपयात भारताने आखलेली ही मंगळ मोहिम जगातील सर्वात कमी खर्चाची मंगळ मोहिम ठरली होती. यामुळे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला होता. सर्व जगाला भारताच्या या यशाची दखल घ्यावी लागली होती.

leave a reply