अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात ‘मास शूटिंग’

- सात जणांचा बळी

48 तासांमधील दुसरी घटना

US shootingवॉशिंग्टन – अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात सॅनफ्रान्सिस्को शहराजवळ झालेल्या अंदाधुंद गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला. मशरुम्सचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांकडून चालविण्यात येणाऱ्या दोन शेतांवर ही गोळीबाराची घटना घडली. सोमवारी दुपारी झालेल्या या घटनेनंतर झाओ चुनली या चिनी वंशाच्या नागरिकाला अटक करण्यात आली आहे. 48 तासांच्या अवधीत कॅलिफोर्नियात घडलेली ही दुसरी मास शूटिंगची घटना ठरतेे. दोन्ही घटनांमध्ये हल्लेखोर आशियाई वंशाचे ज्येष्ठ नागरिक असून ही बाब लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

US shooting-1सोमवारी दुपारी कॅलिफोर्निया प्रांतातील हाफ मून बे म्हणून ओळखण्यात येणाऱ्या भागातील दोन शेतांवर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोर झाओ चुनली यापैकी एका शेतावरील माजी कर्मचारी असल्याचे सांगण्यात येते. दोन्ही शेतांवर झालेल्या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी आहे. हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणांनी झाओ याला अटक केली असून त्याच्याकडून शस्त्रे जप्त केली. हल्ल्यात बळी गेलेले सर्व जण झाओचे सहकारीच असल्याचे उघड झाले आहे. कामाच्या ठिकाणी असणारा जुना वाद हे हल्ल्याचे कारण असल्याचे सांगण्यात येते.

कॅलिफोर्निया प्रांतात 48 तासांच्या अवधीत घडलेली ही दुसरी घटना आहे. शनिवारी रात्री लॉस एंजेलिस शहराजवळ असणाऱ्या मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बेछूट गोळीबाराची घटना घडली होती. यात हल्लेखोरासह 11 जणांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोर हु कान ट्रॅन हा 72 वर्षाचा आशियाई वंशाचा नागरिक असल्याचे सुरक्षायंत्रणांकडून सांगण्यात आले. मात्र या हल्ल्यामागचा उद्देश अजूनही स्पष्ट झालेला नाही.

US shooting dataकॅलिफोर्नियात एकापाठोपाठ घडलेल्या मास शूटिंगच्या घटनांनी अमेरिकेतील ‘गन व्हायोलन्स’चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 2023 साल सुरू झाल्यानंतर पहिल्या 23 दिवसांमध्ये अमेरिकेत ‘मास शूटिंग’च्या तब्बल 38 घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी हीच संख्या 25 होती. 38 घटनांपैकी तीन घटना कॅलिफोर्नियात त्याही अवघ्या सात दिवसांच्या अवधीत समोर आल्या आहेत. त्यामुळे ‘गन व्हायोलन्स’बरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दाही उपस्थित करण्यात येत आहे.

‘गन व्हायोलन्स अर्काईव्ह’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 2022 साली अमेरिकेत ‘मास शूटिंग’च्या सुमारे 650 घटनांची नोंद झाली. या घटनांमध्ये 673 जणांचा बळी गेला असून 2,700 जण जखमी झाले होते. 2020 सालापासून सलग तीन वर्षे अमेरिकेत दरवर्षी 600हून अधिक ‘मास शूटिंग’च्या घटनांची नोंद झाली आहे. या घटनांमागे अमेरिकेतील राजकीय ध्रुवीकरण, घसरलेली आर्थिक स्थिती, पोलिस दलांचे घटते मनुष्यबळ, अमली पदार्थांचा वापर, कमकुवत कायदे व मानसिक आजारांचे वाढते प्रमाण यासारखे घटक कारणीभूत असल्याचे विविध अहवालांमधून सांगण्यात आले आहे.

leave a reply