भारत व मध्य आशियाई देशांची अफगाणिस्तानविषयक बैठक

नवी दिल्ली – अफगाणिस्तानच्या भूमीत दहशतवादी संघटनांचा वावर ही फार मोठ्या चिंतेची बाब ठरते. दहशतवादी संघटनांना केला जाणारा पैशांचा पुरवठा दहशतवाद जिवंत ठेवणाऱ्या रक्तवाहिनीसारखे काम करतो. म्हणूनच दहशतवाद्यांना पुरविल्या जाणाऱ्या पैशांच्या विरोधात कठोर कारवाई अतिशय आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या सर्वच सदस्य देशांनी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटनांना निधी पुरवण्यापासून स्वतःला दूर ठेवावे, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी बजावले.

Ajit Dovalराजधानी नवी दिल्लीत कझाकस्तान, किरगिझिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या चार मध्य आशियाई देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यावेळी उपस्थित नव्हते, पण तुर्कमेनिस्तानच्या राजदूतांनी सदर बैठकीत आपल्या देशाचे प्रतिनिधित्त्व केले. या बैठकीला संबोधित करताना भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी दहशतवादापासून असलेला धोका अधोरेखित केला.

भारतात पहिल्यांदाच अशा स्वरुपाची बैठक आयोजित करण्यात आली असून यात अफगाणिस्तानातील सुरक्षाविषयक स्थिती व अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांपासून संभवणाऱ्या धोक्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. या धोक्याच्या विरोधात भारत व हे मध्य आशियाई देश सहकार्य वाढवून स्वतंत्र यंत्रणा उभारू शकतात. त्या पार्श्वभूमीवर, नवी दिल्लीतील ही बैठक महत्त्वाची ठरते.

दरम्यान, थेट उल्लेख केला नसला तरी दहशतवाद्यांना पैसे व इतर सहाय्य पुरविणाऱ्या पाकिस्तानला भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी लक्ष्य केल्याचे दिसत आहे. अजूनही पाकिस्तानने भारताच्या विरोधात दहशतवादाचा वापर करण्याच्या हालचाली थांबविलेल्या नाहीत. मात्र यापुढे पाकिस्तानच्या या कारवाया सहन करता येणार नाही, असे भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने बजावत आहे.

leave a reply