‘अनिरुद्धाज्‌‍ अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ व संलग्न संस्थांतर्फे आयोजित महारक्तदान शिबिरात १५ हजारांहून अधिक युनिट्‌‍स रक्त जमा

  • महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक व मध्य प्र्रदेश या राज्यांमध्ये एकाच वेळी ८७ ठिकाणी आयोजन
  • शंभराहून अधिक सरकारी व खाजगी रक्तपेढ्यांचा सहभाग

Blood-Donationमुंबई – रविवारी ‘अनिरुद्धाज्‌‍ अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ आणि संलग्न संस्थांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि गोवा, गुजरात, कर्नाटक व मध्य प्र्रदेश या राज्यांमध्ये एकावेळी ८७ ठिकाणी या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमधून एकूण १५ हजारांहून अधिक युनिट रक्त संकलित करण्यात आले. मुंबईतील शिबिरात आठ हजाराहून अधिकजणांनी रक्तदान केले.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून संस्थेतर्फे उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. तर वर्षभरात राज्यातील इतर ठिकाणीही रक्तदान शिबिरांचे या संस्थांमार्फत आयोजन केले जाते. या रविवारी आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरामधून या संस्थांना आतापर्यंत सर्वाधिक प्रमाणात रक्त संकलित करण्यात यश मिळाले.

देशात दरवर्षी रक्ताच्या लाखो युनिटचा तुटवडा भासतो. रक्ताच्या तुटवड्यामुळे कितीतरी शस्त्रक्रिया रखडतात. दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना नियमितपणे रक्ताची आवश्यकता भासते. वेळीच रक्त न मिळाल्याने काहीजणांना आपला जीव गमवावा लागतो. काही दिवसांपूर्वीच ‘स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काऊन्सिल’ने महाराष्ट्रात यावर्षी रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याचे म्हटले होते. केवळ ११ दिवसच पुरेसा ठरेल इतका रक्तसाठा राज्यात शिल्लक असल्याची माहिती स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काऊन्सिलने दिली होती.

Blood-Donation-Campहे लक्षात घेऊन ‘अनिरुद्धाज्‌‍ अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ ‘श्री अनिरुद्ध आदेश पथक’, ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्ध समर्पण पथक’, ‘श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’, ‘अनिरुद्धाज्‌‍ हाऊस ऑफ फ्रेंडस्‌‍’ या संस्थांनी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रविवारी २३ एप्रिल रोजी मुंबईत वांद्रे येथील न्यू इंग्लिश स्कूल, तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात प्रत्येकी १० ठिकाणी, रायगड जिल्ह्यात जिल्ह्यात नऊ ठिकाणी, सांगलीत आठ, सिंधुदूर्ग व रत्नागिरीमध्ये प्रत्येकी पाच ठिकाणी महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. याशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार ठिकाणी, पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी अहमदनगर व पालघर जिल्ह्यात प्रत्येकी दोन ठिकाणी हे शिबिर पार पडले. तसेच धुळे, जळगाव, नागपूर, नाशिक, धाराशिवमध्ये प्रत्येकी एका ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गुजरातमध्ये चार ठिकाणी, कर्नाटकात तीन ठिकाणी, मध्य प्रदेशात दोन तर गोव्यात एका ठिकाणी हे महारक्तदान शिबिर पार पडले. या महारक्तदान शिबिरामध्ये सरकारी व खाजगी मिळून १०७ रक्तपेढ्या सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील महारक्तदान शिबिरात ३८ रक्तपेढ्या सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील रक्तदान शिबिरात ८,०७१ युनिट्‌‍स इतके रक्त जमा झाले. तर उर्वरित महाराष्ट्रातील आणि चार राज्यात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांमधून ६,८७६ पिशव्या रक्त जमा झाले. त्यामुळे संस्थेतर्फे एकाच दिवशी आयोजित रक्तादान शिबिरांमधून एकूण १५,११९ इतके युनिट रक्त रक्तपेढ्यांकडे संकलित करण्यात आले आहे.

leave a reply