अमेरिका व नाटोकडून भारताला ‘सहकार्याचा संदेश’

वॉशिंग्टन – भारत हा अमेरिकेचा साथीदार (अलाय) देश नाही, पण महत्त्वाचा भागीदार देश आहे, असा दावा अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिल’मधील इंडो-पॅसिफिकमधील समन्वयक ‘कर्ट कॅम्बल’ यांनी केला. चीनबरोबरील सीमावादात भारताला अमेरिकेचे संपूर्ण सहकार्य असेल, असेही कॅम्बल यांनी स्पष्ट केले. तर अमेरिकाप्रणित लष्करी आघाडी नाटोचे दरवाजे भारतासाठी सदैव खुले असल्याचे नाटोमधील अमेरिकेच्या राजदूत ज्युलियन स्मिथ यांनी म्हटले आहे.

अमेरिका व नाटोकडून भारताला ‘सहकार्याचा संदेश’गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेच्या बायडेन प्र्रशासनाने स्वीकारलेली धोरणे भारताच्या विरोधात जाणारी असल्याचे उघड झाले होते. भारतातील घडामोडींवर अमेरिकेने केलेली शेरेबाजी तसेच अमेरिकेतील भारतीय दूतावासांवर खलिस्तानी विघटनवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताची ही नाराजी अधिक प्रकर्षाने समोर आली होती. त्यानंतर अमेरिकेने सारवासारव करून भारताबरोबरील आपल्या संबंधांचे दाखले दिले होते. विशेषतः भारताच्या एलएसीवरील चीनच्या कारवायांवर अमेरिकेकडून सातत्याने व्यक्त करण्यात येत असलेली चिंता म्हणजे एकाच वेळी भारताला आश्वासन व इशारा देत असल्याचे दिसते.

चीनच्या एलएसीवरील कारवाया चिंताजनक असल्याचे सांगून अमेरिकेने चीनच्या विरोधात आपला संपूर्ण पाठिंबा भारताला असेल, असे जाहीर केले आहे. वरकरणी हे आश्वासन वाटत असले तरी प्रत्यक्षात चीनच्या आक्रमक कारवायांच्या विरोधात भारताला अमेरिकेचे सहाय्य घ्यावेच लागेल, असा संदेश याद्वारे देण्यात येत आहे. इतकेच नाही तर लडाखच्या एलएसीवरील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर अमेरिकेने भारताला केलेल्या सहाय्याची माहिती उघड करता येणार नाही, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच म्हटले होते. हा देखील अमेरिकेकडून भारताला आपल्या लष्करी सहाय्याच्या आवश्यकतेची आठवण करून देण्याचा भाग ठरतो.

अमेरिका व नाटोकडून भारताला ‘सहकार्याचा संदेश’या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिल’मधील इंडो-पॅसिफिकमधील समन्वयक ‘कर्ट कॅम्बल’ यांनी भारत हा अमेरिकेचा साथीदार देश नाही आणि यापुढेही भारत अमेरिकेचा साथीदार बनणार नाही, असे विधान केले. असे असले तरीही भारत हा अमेरिकेचा निकटतम भागीदार देश आहे व अमेरिका भारताला सर्वतोपरी सहकार्य करील, असा दावा केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत फार मोठे योगदान देणारा महान देश आहे, याची जाणीव अमेरिकेला असल्याचे संकेत कॅम्बेल यांनी आपल्या विधानातून दिले.

21 व्या शतकातील अत्यंत महत्त्वाचा भागीदार म्हणून अमेरिका भारताकडे पाहत असल्याचे कॅम्बल यांनी स्पष्ट केले. तर नाटोमधील अमेरिकेच्या राजदूत ज्युलियन स्मिथ यांनी नाटोचे दरवाजे भारतासाठी सताड उघडी असल्याचा दावा केला. याचा अर्थ पुढच्या आठवड्यात ब्रुसेल्स येथे होणाऱ्या नाटोच्या बैठकीत भारताला आमंत्रित केले जाईल, असा होत नाही, असा खुलासाही स्मिथ यांनी केला आहे. नाटोची सध्या जगभरातील 40 देशांबरोबर भागीदारी आहे. यातील प्रत्येक भागीदारी इतरांपेक्षा वेगळी असल्याचे सांगून भारत यापैकी एक असल्याचे स्मिथ यांनी लक्षात आणून दिले.

leave a reply