अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ तैवानला भेट देणार

 अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्रीवॉशिंग्टन – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे कडवे विरोधक म्हणून ओळख असणारे अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ पुढील आठवड्यात तैवानचा दौरा करणार आहेत. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली. आपल्या दौर्‍यात पॉम्पिओ तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांच्यासह उपपंतप्रधान तसेच परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेणार आहेत. पॉम्पिओ यांच्या दौर्‍यावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, तैवान सरकार आगीशी खेळत असल्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधातील आक्रमक धोरणाचा भाग म्हणून तैवानशी सहकार्य वाढविण्यावर भर दिला होता. ट्रम्प प्रशासनात परराष्ट्रमंत्रीपद भूषविणार्‍या पॉम्पिओ यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला होता. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीला तैवान मुद्यावरून वारंवार फटकारण्याबरोबरच चीनविरोधी निर्णय घेण्यातही पॉम्पिओ यांनी आग्रही भूमिका निभावली होती. ट्रम्प प्रशासनाच्या अखेरच्या टप्प्यात अमेरिकेच्या राजनैतिक अधिकार्‍यांवर तैवान भेटीसंदर्भात असलेले निर्बंध काढण्याचा निर्णयही पॉम्पिओ यांनीच घेतला होता.

या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी तैवानचा दौरा करणे महत्त्वाचे मानले जाते. माजी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांचा दौरा तैवान-अमेरिका मैत्री व अमेरिकेकडून तैवानला मिळणारे समर्थन यांचे प्रतीक ठरते, असे तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पॉम्पिओ तैवानचे खंदे समर्थक असल्याचे तैवानने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पॉम्पिओ यांच्या दौर्‍यावरून चीनने तैवानला लक्ष्य केले असून, अमेरिकेच्या सहाय्यावर तैवानच्या स्वातंत्र्याची स्वप्ने पाहू नकात, असे बजावले. त्याचवेळी चीनने अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांवर निर्बंध लादले असल्याची आठवणही चीनने करून दिली आहे.

leave a reply