कोणताही करार इराणचा अणुकार्यक्रम रोखू शकत नाही

- इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचा अमेरिकन सिनेटर्सना इशारा

इराणचा अणुकार्यक्रमजेरुसलेम – इराणबरोबर सुरू असलेल्या आण्विक वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून येत्या काही दिवसांमध्ये हा करार शक्य असल्याचे संकेत बायडेन प्रशासन देत आहे. मात्र हा संभाव्य करार इराणचा अणुकार्यक्रम अजिबात रोखू शकणार नाही, असा इशारा इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी दिला. २०१५ साली झालेल्या अणुकराराने इराणला अणुबॉम्ब निर्मितीचा मार्ग खुला करून दिला. आता बायडेन प्रशासन करीत असलेला करार आधीपेक्षाही वाईट असल्याचे नेत्यानाहू यांनी बजावले.

बायडेन प्रशासनाने इराणबरोबर सुरू केलेल्या आण्विक वाटाघाटी निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या आहेत. इराणला आर्थिक निधी पुरवून तसेच निर्बंधातून सवलती देऊन बायडेन प्रशासन हा अणुकरार करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. अल्पावधी काळासाठी केला जाणारा हा करार इराणचा अणुकार्यक्रम रोखू शकणार नसल्याचा दावाही काही माध्यमे करीत आहेत. अशा काळात हा अणुकरार मान्य नसलेले तसेच त्याच्या विरोधात असणारे अमेरिकन सिनेटर्स एकामागोमाग इस्राइलमध्ये दाखल होत आहेत.

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर आणि रिपब्लिकन नेते लिंडसे ग्रॅहम यांनी इस्रायलचा दौरा करून पंतप्रधान नफ्ताली बेनेट, संरक्षण मंत्री बेनी गांत्ज, मोसादचे प्रमुख डेव्हिड बार्नी आणि माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांची भेट घेतली होती. ग्रॅहम यांनी उघडपणे आपला या कराराला असलेला विरोध जाहीर केला होता. त्याच्या पुढच्या काही तासात अमेरिकन सिनेटच्या सभापती नॅन्सी पेलोसी यादेखील इस्रायलमध्ये दाखल झाल्या होत्या. पेलोसी यांनी इराण बरोबरच्या संभाव्य कराराचे समर्थन केले होते. तर आता अमेरिकन लोकप्रतिनीधी गृहातील सत्ताधारी डेमोक्रॅट तसेच विरोधी पक्षातील रिपब्लिकन नेते इस्रायलमध्ये उतरले आहेत.

या अमेरिकन लोकप्रतिनिधींना संबोधित करताना माजी पंतप्रधान नेत्यानाहू यांनी इराणबाबत आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन केले. अणुबॉम्ब निर्मितीच्या तयारीत असलेल्या राजवटींना रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारचा करार कामी येऊ शकत नाही. कठोर आर्थिक निर्बंध किंवा लष्करी कारवाईने अशा राजवटींना रोखता येऊ शकते, असे भूतकाळात आपण अनुभवले आहे. याची जाणीव माजी पंतप्रधान नेत्यानाहू यांनी करून दिली. या दोन पर्यायांशिवाय इतर कुठलाही पर्याय इराणचा अणुकार्यक्रमयशस्वी ठरू शकत नाही, असे सांगून नेत्यानाहू यांनी इराणबरोबर अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या आण्विक वाटाघाटींना लक्ष्य केले.तर अणुबॉम्ब निर्मितीच्या प्रयत्नात असलेल्या राजवटींना रोखण्यासाठी इस्रायलने कारवाई केली होते, संबंधित देशांमधील अणुप्रकल्पांवर हवाई हल्ले चढविले होते, याची आठवण इस्रायलच्या माजी पंतप्रधानांनी करून दिली. १९८१ साली इराक तर २००७ साली सिरियाच्या अणुप्रकल्पांवर इस्रायलने चढविलेल्या हवाई हल्ल्यांकडे माजी पंतप्रधान नेत्यानाहू यांनी लक्ष वेधले. नेमक्या शब्दात इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी लष्करी कारवाईची आवश्यकता असल्याचा इशारा नेत्यानाहू यांनी याद्वारे दिला.

येत्या काही दिवसात इराणबरोबर अणुकरार शक्य असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी इस्रायल या कराराशी बांधिल नसल्याचे म्हटले होते. या करारामुळे आखातात हिंसा भडकेल आणि क्षेत्र अस्थिर होईल असा इशारा बेनेट यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिला होता. त्यावर बायडेन प्रशासनाची प्रतिक्रिया आली आहे. अणुकरारातून बाहेर पडून झालेल्या चुकीची पुनरावृत्ती होऊ शकत नाही, असे बायडेन प्रशासनाने स्पष्ट केले. वाटाघाटीतूनच हा करार शक्य आहे, यावर आपला विश्वास असल्याचे, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी इस्रायली माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपण अणुकरार करणार असल्याचे बायडेन प्रशासन ठामपणे सांगत आहे.

leave a reply