लष्करी कारवाई रोखली नाही तर म्यानमार रक्तबंबाळ झालेला दिसेल

-संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या विशेषदूतांचा इशारा

रक्तबंबाळन्यूयॉर्क/नेप्यितौ – आंतरराष्ट्रीय समुदायाने म्यानमारच्या लष्कराकडून निदर्शकांविरोधात सुरू असणारा हिंसाचार रोखला नाही, तर म्यानमार रक्तबंबाळ झालेला दिसेल, असा खरमरीत इशारा संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या विशेष दूतांनी दिला. बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या बैठकीत म्यानमारसाठी नेमलेल्या विशेषदूत ख्रिस्तीन श्रेनर बर्गनर यांनी हा इशारा दिला. म्यानमारमध्ये गेले दोन महिने लष्कराकडून लोकशाहीवादी आंदोलनाविरोधात कारवाई सुरू असून त्यात आतापर्यंत ५५०हून अधिक जणांचा बळी गेला आहे.

म्यानमारमध्ये गेले दोन महिने लष्करी बंडाविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. लष्कराने जबरदस्तीने ताब्यात घेतलेली सत्ता सोडावी आणि लोकशाहीवादी सरकारच्या हाती सर्व सूत्रे द्यावीत यासाठी व्यापक आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाला देशाच्या कानाकोपर्‍यातून प्रचंड समर्थन मिळाले असून बंडखोर संघटना व धार्मिक गटांनीही त्यात उडी घेतली आहे. आंदोलनाला मिळणारे हे वाढते समर्थन पाहून लष्कर चांगलेच बिथरल्याचे समोर येत आहे. आंदोलनकर्त्यांसह सामान्य जनतेत दहशत व भीतीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी त्यांनी आपल्या कारवाईची तीव्रता अधिकच वाढविली आहे.

रक्तबंबाळगेल्या काही दिवसात म्यानमारच्या लष्कराकडून वांशिक गटांवरही हवाईहल्ले व इतर कारवाई सुरू झाली आहे. कारवाईची व्याप्ती वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरून अधिकाधिक आक्रमक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून विशेष दूतांनी दिलेला इशारा त्याचाच भाग ठरतो. म्यानमारसाठी नेमलेल्या विशेष दूत ख्रिस्तीन श्रेनर बर्गनर यांनी सुरक्षा परिषदेतील बैठकीत, आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रितरित्या निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. म्यानमारच्या लष्कराने सुरू केलेल्या हिंसक कारवाईविरोधात आंतरराष्ट्रीय समुदाय एकत्र आला नाही, तर या देशात रक्ताचे पाट वाहताना दिसतील असे बर्गनर यांनी बजावले.

रक्तबंबाळम्यानमारच्या लष्कराने आंदोलन रोखण्यासाठी देशातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केली आहे. मात्र लष्कराच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी आंदोलकांनी पर्यायी मार्ग शोधून काढले असून रेडिओलहरी व इतर सेवांचा वापर केला जात आहे. म्यानमारमधील प्रमुख लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन स्यू की यांच्याविरोधात पाचवे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात गोपनीय कायद्याचा भंग केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. यापूर्वी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, ब्रिटनने म्यानमारवर नवे निर्बंध लादल्याचे जाहीर केले आहे. त्यात लष्कराशी संबंधित उद्योगसमूहाला लक्ष्य करण्यात आले आहे. मुले व निरपराध नागरिकांची हत्या घडवून म्यानमारच्या लष्कराने नवी नीचांकी पातळी गाठली आहे, अशी टीका ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी यावेळी केली. ब्रिटनने लादलेल्या निर्बंधांपूर्वी अमेरिकेनेही म्यानमारच्या लष्कराविरोधात निर्बंध लादले होते. त्याचवेळी ब्रिटनमधील ‘नेक्स्ट’ या कंपनीने म्यानमारमधून होणारी आयात बंद केल्याची घोषणा केली आहे.

leave a reply