अफगाणिस्तानातील कोट्यवधी मुलांना तातडीच्या मानवतावादी सहाय्याची गरज

- संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा

न्यूयॉर्क – अफगाणिस्तान तालिबानच्या दहशतवाद्यांच्या ताब्यात गेल्यानतर, या देशातील हृदयद्रावक परिस्थिती समोर येऊ लागली आहे. अफगाणिस्तानातील सुमारे एक कोटी मुलांना तातडीच्या मानवतावादी सहाय्याची गरज आहेे. तर उपासमार किंवा अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे वर्षअखेरीपर्यंत दहा लाख मुलांचा बळी जाऊ शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘युनिसेफ’च्या प्रमुख हेनरिता फोरे यांनी दिला. आंतरराष्ट्रीय समुदायाने या मुलांसाठी सहाय्य पुरवावे, असे आवाहन फोरे यांनी केले. दरम्यान, तालिबानचे दहशतवादी मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या करीत असल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या माजी नेत्याने केला आहे.

अफगाणिस्तानातील कोट्यवधी मुलांना तातडीच्या मानवतावादी सहाय्याची गरज - संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारातालिबानने राजधानी काबुलसह बहुतांश अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून हा देश अजिबात सुरक्षित राहिलेला नाही, असा दावा केला जातो. तालिबानचे नेते दोहा येथील बैठकीत किंवा माध्यमांसमोर औदार्य तसेच सर्वांना सामावून घेण्याची भाषा बोलत असले तरी प्रत्यक्षात तालिबानचे दहशतवादी अफगाणी तसेच पाश्‍चिमात्य जनतेवर अत्याचार करीत असल्याचे पुरावे समोर येऊ लागले आहेत. ‘युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड-युनिसेफ’ने अफगाणिस्तानातील या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली.

अफगाणिस्तानातील मुले आधीपासूनच मानवतावादी सहाय्यावर अवलंबून होती. त्यात दीड वर्षांमध्ये कोरोनाचे थैमान, दुष्काळ, आर्थिक संकट आणि गेल्या काही महिन्यांपासून पेटलेल्या संघर्षामुळे या मानवतावादी सहाय्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. अशा परिस्थितीत, अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर येथील मुलांच्या भवितव्यावरील संकट अधिकच गडद झाल्याचा इशारा युनिसेफच्या प्रमुख हेनरिता फोरे यांनी दिला.

जानेवारी महिन्यापासून अफगाणिस्तानात मुलांच्या अधिकारांचे दोन हजारांहून अधिक वेळा गंभीर उल्लंघन झाले आहे. याशिवाय संघर्षात विस्थापित झालेल्या महिला व मुलांची संख्या खूप मोठी आहे. एक कोटी मुलांना तातडीच्या मानवतावादी सहाय्याची गरज असल्याचे फोरे म्हणाल्या. तर दहा लाख मुलांचा उपासमार किंवा अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे बळी जाईल, असा इशारा फोरे यांनी दिला. या अफगाणी मुलांपर्यंत अन्न पोहोचविण्यासाठी 20 कोटी डॉलर्सच्या सहाय्याची गरज असल्याची मागणी संयुक्त राष्ट्रसंघाने केली.अफगाणिस्तानातील कोट्यवधी मुलांना तातडीच्या मानवतावादी सहाय्याची गरज - संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा

2002 सालापासून जागतिक बँकेने अफगाणिस्तानला 5.3 अब्ज डॉलर्सचे सहाय्य केले होते. पण अफगाणिस्तानात तालिबान आल्यापासून जागतिक बँकेने अफगाणिस्तानला देण्यात येणारे सहाय्य रोखले. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही अशीच भूमिका स्वीकारली. यामुळे अफगाणी मुलांपर्यंत मदत पोहोचणे अवघड होत आहे. अफगाणिस्तानातील मानवाधिकार संघटना व कार्यकर्ते देखील मुले आणि महिलांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त करीत आहेत.

तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानातील लाखो मुलं आणि महिला सुरक्षित नसल्याची टीका संयुक्त राष्ट्रसंघातील अफगाणिस्तानचे राजदूत नसिर अहमद अंदिशा यांनी केली. तालिबान घराघरात घुसून महिला व मुलींचा शोध घेऊन त्यांच्याशी जबरदस्तीने लग्न लावत असल्याचा आरोप नसिर यांनी केला. तर पंजशीर प्रांताच्या अंद्राब भागात तालिबानच्या दहशतवाद्यांनी मुले आणि वृद्धांचे अपहरण करून हत्याकांड घडविल्याचा ठपका माजी मंत्री मसूद अंद्राबी यांनी केला.

leave a reply