‘मंकीपॉक्स व्हायरस’ वेगाने फैलावण्याचा धोका

-‘डब्ल्यूएचओ'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा इशारा

Monkeypox-Virusजीनिव्हा – ‘मंकीपॉक्स व्हायरस’ची साथ येत्या काही महिन्यात अधिक फैलावण्याचा धोका आहे, असा इशारा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चे (डब्ल्यूएचओ) वरिष्ठ अधिकारी हॅन्स क्लुग यांनी दिला. गेल्या दोन आठवड्यांमध्ये या विषाणूची लागण झालेले जवळपास 100 रुग्ण आढळले आहेत. 14 देशांमध्ये ही साथ पसरली असून त्यातील 10 देश युरोपातील आहेत. दोन आठवड्यांपूर्वी नायजेरियातून आलेल्या एका ब्रिटीश नागरिकाला ‘मंकीपॉक्स’ची लागण झाल्याचे आढळले होते. त्यानंतर हा विषाणू वेगाने पसरू लागल्याने ‘डब्ल्यूएचओ’कडून आपत्कालिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

monkeypox-disease-virusआफ्रिका खंडातील नायजेरियामधून ब्रिटनमध्ये आलेल्या एका व्यक्तीला ‘मंकीपॉक्स व्हायरस’ची लागण झाल्याचे 10 मे रोजी आढळले होते. या रुग्णावर ब्रिटीश रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर गेल्या दोन आठवड्यात ब्रिटनमध्ये ‘मंकीपॉक्स व्हायरस’चे 20हून अधिक रुग्ण आढळले आहेत. ब्रिटनपाठोपाठ युरोपातील इतर देशांमध्येही ‘मंकीपॉक्स व्हायरस’चे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. युरोपातील फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, नेदरलॅण्डस्‌‍, बेल्जियम, स्वीडन व स्वित्झर्लंडमध्ये ‘मंकीपॉक्स व्हायरस’चे रुग्ण आढळले आहेत.

युरोपिय देशांव्यतिरिक्त अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व इस्रायलमध्ये ‘मंकीपॉक्स व्हायरस’चे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. जगभरातील 14 देशांमध्ये आढळलेल्या रुग्णांची संख्या 90 वर गेली आहे. तर जवळपास 50 संशयितांची तपासणी सुरू असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’कडून सांगण्यात आले. 2017 साली नायजेरियात आलेल्या साथीनंतर आलेली ‘मंकीपॉक्स व्हायरस’ची ही पहिलीच साथ आहे.

Monkeypox Virus‘मंकीपॉक्स व्हायरस’चा संसर्ग प्राण्यांपासून प्राण्यांना व माणसांना होतो. मानवाकडून मानवाला हा संसर्ग सहसा होत नसल्याचे जागतिक संघटनेने (डब्ल्यूएचओ) सुरूवातीच्या काळात म्हटले हेोते. पण आता मानवाकडून मानवाला या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या रोगाचा फैलाव वेगाने वाढण्याची भीती ‘डब्ल्यूएचओ’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. युरोपिय देशांमध्ये उन्हाळ्यात मोठे समारंभ, सोहळे, पार्टी यांचे आयोजन केले जाते व त्यातून रोगाचा फैलाव जास्त प्रमाणात होऊ शकतो, असा इशारा ‘डब्ल्यूएचओ युरोप’चे संचालक हॅन्स क्लुग यांनी दिला.

‘मंकीपॉक्स व्हायरस’ हा देवीच्या रोगाच्या विषाणूप्रमाणे विषाणू असून 1970 साली आफ्रिकेतील ‘डीआर काँगो’मध्ये पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर जवळपास 10 आफ्रिकी देशांमध्ये ‘मंकीपॉक्स व्हायरस’च्या साथी येऊन गेल्या आहेत. 2003 साली अमेरिकेतही या विषाणूची साथ आली होती. आफ्रिकेबाहेर ‘मंकीपॉक्स व्हायरस’ आढळण्याची ही पहिलीच वेळ ठरली होती. ‘मंकीपॉक्स व्हायरस’वर ठोस उपचारपद्धती नसून सध्या उपलब्ध असलेली एक लस 85 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचे सांगण्यात येते. ताप, डोकेदुखी, सूज, स्नायूंमध्ये वेदना यासारखी लक्षणे असलेल्या या रोगात अंगावर मोठ्या प्रमाणात फोड तसेच पुरळ उठते. लागण झालेल्या रुग्णांपैकी दगावणाऱ्यांचे प्रमाण तीन ते साडेतीन टक्के असल्याचे सांगण्यात येते.

सध्या जगभरात कोरोनाची साथ सुरू असतानाच आणखी एका साथीचा फैलाव सुरू झाल्याने त्यावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

leave a reply