इटलीत चोवीस तासात कोरोनाव्हायरसचे दिड हजाराहून अधिक बळी

रोम, दि. १(वृत्तसंस्था) – कोरोनाव्हायरसने जगभरात ४५,३३५ जणांचा बळी घेतला आहे. इटलीमध्ये या साथीमुळे गेल्या चोवीस तासात १,५६४ जण दगावले. तर अमेरिकेतील कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद दोन लाखाच्या पुढे गेली आहे. तर दिवसभरात अमेरिकेत ३६ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली.

कोरोनाव्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी इटली, स्पेन या देशांनी लॉकडाउनची घोषणा केली होती. पण या देशाची जनता या आदेशांचे पालन करीत नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. याचा थेट परिणाम या देशातील या साथीविरोधात सुरू असलेल्या लढ्यावार होत आहे. इटलीत या साथीत दगावणार्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. इटलीमध्ये १३,१५५ जणांचा बळी गेला असून या देशात तब्बल १,१०,५७४ रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासात इटलीमध्ये जवळपास नऊ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासात स्पेनमध्ये ८०० हून अधिक जणांचा बळी गेला असून या देशात एकूण नऊ हजाराहून अधिक जण दगावले आहेत. इटली, स्पेन पाठोपाठ आता अमेरिकेतील बळींची संख्या देखील चार हजारांवर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात अमेरिकेतही आठशेहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. गेल्या चार दिवसात अमेरिकेतील बळींची संख्या दुप्पटीने वाढली आहे.

leave a reply