पुढील वर्षभरात चीनमध्ये कोरोनामुळे दहा लाखांहून अधिक जणांचा बळी जाऊ शकतो

- अमेरिकी अभ्यासगटाच्या अहवालातील इशारा

दहा लाखांहून अधिकवॉशिंग्टन/बीजिंग – चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने कोरोनाविरोधात राबविलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल केल्यानंतर देशभरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विस्फोट होईल व २०२३ मध्ये जवळपास १० लाख जणांचा बळी जाऊ शकतो, असा इशारा अमेरिकी अभ्यासगटाच्या अहवालात देण्यात आला आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स ॲण्ड इव्हॅल्युएशन’ने(आयएचएमई) शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या नव्या अहवालात हा इशारा देतानाच एप्रिल महिन्यात चीनमध्ये कोरोनाचा सर्वात मोठा उद्रेक पहायला मिळेल, असेही बजावले. काही दिवसांपूर्वीच चिनी संशोधक व ब्रिटीश अभ्यासगटाने, ‘झीरो कोविड पॉलिसी’ पूर्णपणे शिथिल केल्यास चीनमधील २० लाखांहून अधिक जण कोरोना साथीत दगावू शकतात, याकडे लक्ष वेधले होते.

चीनने या महिन्याच्या सुरुवातीला ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गेल्या दहा दिवसांमध्ये चीनच्या बहुतांश भागात त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून ‘मास टेस्टिंग’ व ‘क्वारंटाईन’संदर्भातील बहुतांश नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र निर्बंध शिथिल होत असतानाच चीनच्या राजधानीसह काही शहरांमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्याचे समोर येत आहे. राजधानी बीजिंगसह प्रमुख शहरांमधील हॉस्पिटल्स तसेच क्लिनिक्समध्ये रुग्णांची गर्दी वाढत चालल्याचे दावे करण्यात आले आहेत. बीजिंगच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाचे ५०हून अधिक गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत. शांघायसह काही शहरांमध्ये ताप तसेच कोरोनाच्या औषधांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

दहा लाखांहून अधिककाही शहरांमध्ये कोरोनाचे बळी वाढत असले तरी चिनी यंत्रणा ही बाब लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा सोशल मीडिया तसेच माध्यमांकडून करण्यात येत आहे. ‘फायनान्शिअल टाईम्स’ या ब्रिटीश दैनिकाने दिलेल्या एका वृत्तात, राजधानी बीजिंगमधील दफनभूमीमध्ये कोरोनाच्या ३०हून अधिक रुग्णांना पुरल्याचा दावा करण्यात आला आहे. काही दफनभूमींमध्ये जागा शिल्लक नसून मृतदेह बाहेर ठेवल्याचेही सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर अमेरिकी अभ्यासगटाने दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

काही दिवसांपूर्वी ब्रिटनच्या ‘एअरफिनिटी’ या गटाने चीनमधील कोरोनासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात कोरोना निर्बंध शिथिल केल्यास चीनमधील १३ ते २१ लाख नागरिक दगावतील, असे सांगण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीला हाँगकाँगमधील निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोना साथीचा उद्रेक झाला होता. त्या आधारावर ब्रिटीश अभ्यासगटाने आपला अहवाल तयार केला आहे. यापूर्वी मे महिन्यात अमेरिका व चीनच्या संशोधकांनी ‘नेचर मेडिसिन’ या संशोधनपर जर्नलमध्ये लिहिलेल्या लेखात, ‘झीरो कोविड पॉलिसी’ पूर्णपणे शिथिल केल्यास १५ लाख जणांचे बळी जाऊ शकतात, असे बजावण्यात आले होते.

leave a reply