युरोपिय महासंघ व ब्रिटनकडून रशियाच्या ‘वॅग्नर ग्रुप’ला दहशतवादी घोषित करण्याच्या हालचाली

पॅरिस/लंडन/मॉस्को – युक्रेनमधील युद्धात सक्रिय सहभागी असणाऱ्या रशियाच्या ‘वॅग्नर ग्रुप’ या खाजगी लष्करी कंपनीला दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. युरोपिय महासंघ व ब्रिटनने यासाठी पुढाकार घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले असून फ्रान्सच्या संसदेत यासंदर्भातील एक ठरावही मंजूर करण्यात आला. यापूर्वी युरोपातील लिथुआनिया व इस्टोनिया या देशांनी ‘वॅग्नर ग्रुप’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

युरोपिय महासंघ व ब्रिटनकडून रशियाच्या ‘वॅग्नर ग्रुप’ला दहशतवादी घोषित करण्याच्या हालचालीरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे निकटवर्तिय असणाऱ्या येव्गेनी प्रिगोझिन यांनी स्थापन केलेली ‘वॅग्नर ग्रुप’ ही खाजगी लष्करी कंपनी म्हणून ओळखण्यात येते. रशियन लष्करातील माजी सैनिक तसेच अधिकारी या कंपनीचा भाग आहेत. त्याचवेळी अनेक परदेशी नागरिकही या कंपनीत सामील झाल्याचे सांगण्यात येते. ‘वॅग्नर ग्रुप’ हा पुतिन यांच्या धोरणांची अंमलबजावणी करणारा गट असल्याचा आरोप पाश्चिमात्य देश करीत आहेत.

गेल्या काही महिन्यात विविध आफ्रिकी देशांमध्ये ‘वॅग्नर ग्रुप’चा वाढता सहभाग दिसून आला आहे. यात माली, सुदान, मोझांबिक, लिबिया, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक यासारख्या देशांचा समावेश आहे. युरोपिय देश तसेच अमेरिकेने याबाबत वारंवार आवाज उठविला असून आफ्रिकी देशांना इशारेही देण्यात आले आहेत. मात्र आफ्रिकी देशांनी त्याकडे दुर्लक्ष केले असून सुरक्षेसाठी आवश्यक सहाय्य घेण्यात आल्याचे कारण पुढे केले आहे.

पण ‘वॅग्नर ग्रुप’च्या माध्यमातून रशियाचा आफ्रिका व इतर देशांमधील वाढता हस्तक्षेप पाश्चिमात्य देशांना चांगलाच खटकतो आहे. अमेरिका व युरोपिय महासंघाने यापूर्वी ‘वॅग्नर ग्रुप’वर निर्बंध लादले आहेत. मात्र ही कारवाई पुरेशी न ठरल्याने आता त्याला थेट दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यापूर्वी निर्बंधांच्या कारवाईनंतर रशिया सरकारने आपला व ‘वॅग्नर ग्रुप’चा संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. पण दहशतवादी गट ठरविल्यानंतर रशियाकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटू शकते, असा दावा विश्लेषक करीत आहेत.

ब्रिटनच्या गृह विभागाने ‘वॅग्नर ग्रुप’ला दहशतवादी गट म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव तयार केला असून येत्या काही दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल, असे वृत्त ‘द टाईम्स’ या ब्रिटीश दैनिकाने दिले आहे.

हिंदी English

 

leave a reply