वॉशिंग्टन/ब्रुसेल्स – अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ या सोशल मीडिया नेटवर्कवर मिळविलेल्या ताब्यानंतर त्याच्या कार्यपद्धती व नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले होते. यावरून पाश्चिमात्य देशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अमेरिका तसेच युरोपिय महासंघाने ट्विटरवर कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन यांनी, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून मस्क यांच्या ट्विटर व्यवहाराची चौकशी होऊ शकते, असे वक्तव्य केले. तर ट्विटरमधील ‘कंटेन्ट मॉडरेशन पॉलिसी’च्या मुद्यावर या नेटवर्कवर बंदी टाकण्याचा इशारा युरोपिय महासंघाने दिला आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस एलॉन मस्क यांनी ४० अब्ज डॉलर्सहून अधिक रकमेचा प्रस्ताव देत ट्विटरवर ताबा मिळविला होता. त्यानंतर त्यांनी या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली होती. ट्विटरमधील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची गच्छंती करत नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले. गेल्या काही वर्षात ट्विटरवरून कायमची हकालपट्टी केलेल्या अनेक जणांचे अकाऊंट्स पुन्हा सुरू करण्यात आले होते. त्याचवेळी अधिकृत अकाऊंटची ‘ब्ल्यू टिक’ हवी असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतील, असेही मस्क यांनी जाहीर केले होते.
मस्क यांनी ट्विटरचे नियम तसेच कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा उदारमतवादी तसेच डाव्या विचारसरणीच्या गटांना खटकत असून अनेकांनी ट्विटर अकाऊंट बंद करण्याचाही निर्णय घेतला होता. मस्क यांच्या काही निर्णयांवर आघाडीच्या पाश्चिमात्य देशांच्या राजवटींनीही नाराजी व्यक्त केली. त्यातूनच आता मस्क यांच्या व्यवहारांची चौकशी करण्याचा तसेच जुने नियम कायम ठेवण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. ट्विटरची सूत्रे हाती घेण्यापूर्वी व त्यानंतरही मस्क यांनी बायडेन प्रशासनाच्या निर्णयावर टीका केली होती. त्यामुळे बायडेन प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करून चौकशी करण्याची तयारी सुरू केली आहे.
तर युरोपिय देशांनी ट्विटरच्या नियमांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांचा मुद्दा उचलला असून त्यावरून मस्क यांच्याशी संघर्षावी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. बुधवारी एलॉन मस्क व युरोपिय अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर आली असून त्यात युरोपिय अधिकाऱ्यांनी थेट बंदी टाकण्याचा इशारा दिल्याचे वृत्त ‘फायनान्शिअल टाईम्स’ या दैनिकाने दिले आहे.
हिंदी