म्यानमारमध्ये जुंटा राजवटीच्या कारवाईत 20 जणांचा बळी

नेप्यितौ – म्यानमारच्या जुंटा राजवटीविरोधात संघर्ष छेडणार्‍या गावकर्‍यांवर लष्कराने केलेल्या कारवाईत 20 जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत. याआधी चिन स्टेटमधील मिंदात भागात लष्कर व स्थानिक सशस्त्र गटांमध्ये उडालेल्या चकमकींमध्ये 10 पेक्षा अधिक जवानांचा बळी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

फेब्रुवारी महिन्यात म्यानमारच्या लष्कराने बंड करून सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. लष्कराच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी म्यानमारच्या जनतेने रस्त्यावर उतरून लोकशाहीवादी आंदोलन छेडले होते. लष्कराच्या क्रूर कारवाया व भीषण अत्याचारानंतरही म्यानमारच्या जनतेने माघार घेतलेली नाही. जवळपास चार महिने उलटून गेल्यानंतरही आंदोलन कायम असून उलट त्याची व्याप्ती वाढताना दिसत आहे. हे आंदोलन असतानाच जुंटा राजवटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे स्वरुपही बदलू लागल्याचे दिसत आहे. म्यानमारच्या अनेक भागांमध्ये स्थानिकांनी लष्कराविरोधात संघर्ष सुरू केला आहे. काही भागांमध्ये नवे सशस्त्र गट तयार झाले असून जुन्या बंडखोर गटांनीही पुन्हा शस्त्रे हाती घेतल्याचे दिसत आहे. शनिवारी ‘इरावदी डेल्टा रिजन’ भागातील एका गावात लष्कराने धाड टाकली. गावात शस्त्रसाठा लपविण्यात आला असून तो ताब्यात घेण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याच कारण लष्कराने पुढे केले होते. मात्र लष्कराच्या या कारवाईला गावकर्‍यांनी जोरदार विरोध केला. यावेळी लष्कर व गावकर्‍यांमध्ये उडालेल्या संघर्षात 20 जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. लष्कराने या कारवाईवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.म्यानमारमध्ये जुंटा राजवटीच्या कारवाईत 20 जणांचा बळी

इरावदीमधील या कारवाईपूर्वी चिन स्टेटमधील मिंदातमध्येही लष्कर व स्थानिक गटांमध्ये चकमकी झाल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी लष्कराने चिन स्टेट-मागवे सीमेवरील एक गाव ताब्यात घेतले होते. या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘चिनलँड डिफेन्स फोर्स’ या स्थानिक सशस्त्र गटाने ‘हतलिन टाऊनशिप’ भागातील लष्करी ठाण्यावर हल्ला चढविला. यात किमान सात जवानांचा बळी गेल्याचा दावा स्थानिक गटाने केला आहे. ‘म्यानमार नाऊ’ या वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. लष्कर व स्थानिक सशस्त्र गटांमध्ये अशा चकमकी सातत्याने झडत असल्याचे समोर येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, जुंटा राजवटीचे प्रमुख जनरल मिन आँग हलेंग यांनी म्यानमारच्या सर्व भागांमध्ये अद्यापही लष्कराला नियंत्रण मिळविता आले नाही, याची कबुली दिली आहे. गेल्या महिन्यात एका चिनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ही माहिती समोर आल्याचे ‘द इरावद्दी’ या वेबसाईटने म्हटले आहे.

दरम्यान, म्यानमारमधील समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘आसियन’कडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. म्यानमारच्या लोकशाही राजवटीचा भाग असणारे नेते व वांशिक तसेच बंडखोर गटांनी एकत्र येऊन ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’ने ‘आसियन’वर आपला विश्‍वास नसल्याचे म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात ‘आसियन’च्या दोन विशेष दूतांनी म्यानमारला भेट दिली होती. यावेळी त्यांनी फक्त जुंटा राजवटीचे प्रमुख व संबंधित अधिकार्‍यांची भेट घेतली. म्यानमारच्या ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’ने विनंती करूनही त्यांची भेट घेण्याचे ‘आसियन’ने टाळले. त्यामुळे म्यानमारच्या लोकशाहीवादी गटांमध्ये नाराजीची भावना असून ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’च्या वक्तव्यातून ही नाराजी जाहीर होत आहे. म्यानमारमधील संघर्षाची आंतरराष्ट्रीय पातळीवर आवश्यक त्या प्रमाणात दखल घेतली जात नसल्याची तक्रार होत आहे. विशेषतः मानवाधिकार व लोकशाहीचा आग्रह धरणारे अमेरिकेचे बायडेन प्रशासन म्यानमारमधील लष्करावर कठोर कारवाई करण्यास तयार नसल्याचे समोर येत आहे.

leave a reply