येमेनच्या मयुन बेटावर युएईचा हवाई तळ – येमेनी लष्करी अधिकार्‍याचा दावा

सना – बाब अल-मन्देबच्या आखातातील येमेनच्या मयुन बेटावर धावपट्टी उभारल्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. संयुक्त अरब अमिरातीने (युएई) ही धावपट्टी उभारून मयुन बेटावर हवाईतळ कार्यान्वित करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याची माहिती येमेनच्या लष्करी अधिकार्‍याने दिली. याचे पडसाद येमेनच्या संसदेत उमटले असून युएईने येमेनमधील हादी सरकारचा विश्‍वास गमावल्याची टीका येमेनच्या संसद सदस्यांनी केली. दरम्यान, सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी हवाईतळ उभारल्यामुळे, येमेनमधील हौथी बंडखोरांबरोबरच रेड सीच्या क्षेत्रातून प्रवास करणार्‍या इराणच्या जहाजांवर नजर ठेवणेही युएईला शक्य होईल.

येमेनच्या मयुन बेटावर युएईचा हवाई तळ - येमेनी लष्करी अधिकार्‍याची माहितीजगभरातील अतिसंवदेनशील आणि अतिमहत्त्वाच्या ठिकाणांवर नजर ठेवणार्‍या प्लॅनेट लॅब्स आयनएसी. या कंपनीने मिळविलेले मयुन बेटाचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स दोन दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले. एडनच्या समुद्राला रेड सीबरोबर जोडणार्‍या बाब अल-मन्देबच्या आखातातील मयुन बेटावर धावपट्टी उभारल्याचे या फोटोग्राफ्समध्ये स्पष्टपणे दिसत होते. जिवंत ज्वालामुखीसाठी प्रसिद्ध असलेला मयुन बेट हा येमेनच्या सागरी हद्दीत येतो. सुमारे 5.6 किलोमीटरच्या या बेटावर 1.85 किलोमीटर लांबीची धावपट्टी उभारण्यात आली आहे.

11 एप्रिल रोजी घेतलेल्या फोटोग्राफमध्ये धावपट्टी उभारण्याचे काम सुरू होते. तर 18 मे रोजीच्या फोटोग्राफ्समध्ये धावपट्टीचे काम पूर्ण झाल्याचे दिसत होते. याशिवाय या धावपट्टीच्या शेजारी विमानांसाठी तीन हँगर्स उभारले आहेत. धावपट्टीची लांबी पाहता या ठिकाणी टेहळणी किंवा लष्करी विमान उतरविण्याची तयारी सुरू असल्याचा दावा लष्करी विश्‍लेषक करीत आहेत. तर युएईने ही धावपट्टी उभारल्याचा आरोप इराणच्या वृत्तसंस्थेने केला आहे. येमेनमधील हादी सरकारने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.येमेनच्या मयुन बेटावर युएईचा हवाई तळ - येमेनी लष्करी अधिकार्‍याची माहिती

पण हादी सरकारशी प्रामाणिक असलेल्या लष्करी अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, युएईनेच मयुन बेटावर धावपट्टीची निर्मिती करून हवाईतळ उभारला आहे. काही आठवड्यांपूर्वी शस्त्रसाठा, लष्करी उपकरणे आणि जवानांना घेऊन युएईचे जहाज मयुन बेटावर दाखल झाल्याची माहिती या लष्करी अधिकार्‍याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे युएईने मयुन बेटावर हवाईतळ कार्यान्वित केल्याचे दिसत आहे. हे फोटोग्राफ्स व यासंबंधीची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर येमेनमधील संसदेत याचे पडसाद उमटले आहेत.

युएईने खरंच ही धावपट्टी उभारली आहे का? तसे असेल तर युएईने येमेनमधील हादी सरकारची फसवणूक केलेली आहे, असे आरोप येमेनच्या संसदेत होत आहे. येमेनमध्ये सध्या दोन सरकार समांतर राज्यकारभार चालवित आहेत. येमेनची राजधानी सनावर इराणसमर्थक हौथी राजवटीचे नियंत्रण आहे. तर येमेनची आर्थिक राजधानी असलेल्या एडनमध्ये राष्ट्राध्यक्ष आबेद राबू मन्सूर हादी यांचे आघाडी सरकार आहे. हादी यांच्या सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. तसेच गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ सौदी व अरब देशांचे लष्कर हादी सरकारच्या बाजूने येमेनमधील हौथी बंडखोरांविरोधात संघर्ष करीत आहेत. यामध्ये युएईचाही समावेश आहे.येमेनच्या मयुन बेटावर युएईचा हवाई तळ - येमेनी लष्करी अधिकार्‍याची माहिती

अशा परिस्थितीत युएईच्या तळामुळे नवा वाद सुरू झाला आहे. हादी सरकार आणि युएई यांच्यातील तणावही यामुळे समोर येत आहे. काही वर्षांपूर्वी युएईने हादी सरकारकडे मयुन बेट 20 वर्षांच्या भाडेतत्वावर देण्याची मागणी केली होती. यासंबंधीचा करार झाल्याचे तपशील आलेले नाहीत. पण गेल्या दोन वर्षांपासून हौथी बंडखोरांविरोधी लढ्यात सहभागी झालेले येमेनमधील युएई समर्थक टोळ्या आणि हादी सरकार यांच्यात मतभेद असल्याचे उघड झाले होते. सौदीने मध्यस्थी करून युएई तसेच समर्थक टोळ्या आणि हादी सरकारमध्ये समेट घडविला. मात्र मयुन बेटाच्या निमित्ताने युएई आणि येमेनच्या हादी सरकारमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत.

दरम्यान, मयुन बेटावरील युएईचा हवाईतळ हा सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा ठरू शकतो, असे लष्करी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. या बेटामुळे रेड सीच्या क्षेत्रातून प्रवास करणार्‍या जहाजांवर नजर ठेवणे युएईला शक्य होणार आहे. याआधी युएईने एडनच्या समुद्रातील येमेनच्याच सोकोट्रा बेटावर लष्करी तळ उभारण्यास सुरुवात केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी युएईने इस्रायली पर्यटकांना देखील सोकोट्रा बेटावरील पर्यटनासाठी नेले होते, अशा बातम्या आल्या होत्या.

leave a reply