नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे शुक्रवारी निधन झाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांच्यावर अहमदाबाद येथील युएन मेहता हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. इथेच शुक्रवारी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी हिराबेन यांनी अखेरचा श्वास घेतला.
100 वर्षांच्या गौरवशाली जीवनाची अखेर झाली, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली. हिराबेन यांच्या निधनावर देशभरातून तसेच विदेशातूनही शोकसंदेश येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी हिराबेन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
हिराबेन यांच्यावर गुजरातच्या गांधीनगर येथे सकाळी 9.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. हिराबेन यांच्या निधनावर सर्वसामान्य नागरिकांपासून देशातील प्रमुख नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदी यांची माता हिराबेन यांनी 100 वर्षे केलेला संघर्ष भारतीय मुल्यांचे प्रतिनिधित्त्व करणारा असल्याचे सांगून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आयुष्यात आईला फार मोठे स्थान होते, याची सातत्याने आठवण करून दिली, याकडे लक्ष वेधून राष्ट्रपती मुर्मू यांनी हिराबेन यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना केली आहे. साधेपणा, उदात्तता व सद्गुण या मातृत्त्वाच्या साऱ्या छटा हिराबेन यांच्या जीवनामध्ये होत्या, असे सांगून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी पंतप्रधान मोदी यांना आपला शोकसंदेश पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनीही पंतप्रधान मोदी यांना शोकसंदेश पाठवून ‘मी तुमच्या दुःखात सहभागी आहे’, असे म्हटले आहे. सिंगापूर, मलेशिया, दक्षिण कोरियाच्या नेत्यांकडूनही अशाच स्वरूपाचे शोकसंदेश आले आहेत.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हिराबेन यांचा फार मोठा प्रभाव होता, असे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या पत्रात पंतप्रधान शेख हसिना यांनी हा उल्लेख करून हिराबेन यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान मोदी आईच्या निधनासारखी हानी होऊ शकत नाही, असे आपल्या संदेशात म्हटले आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहाल प्रचंड यांनीही आपल्या संवेदना व्यक्त केल्या असून भूतान, श्रीलंका व मालदीवच्या नेत्यांनीही हिराबेन यांच्या निधनावर शोकसंदेश पाठविला आहे.