पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जनरल रावत यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली – हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेल्या जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि संरक्षणदलाच्या ११ अधिकार्‍यांच्या पार्थिवावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी गुरुवारी श्रद्धांजली वाहिली. देशाने आपल्या शूर पुत्रांना गमावल्याची भावना यावेळी सर्वांच्या मनात होती. दिल्लीच्या पालम एअरपोर्टवरील दृश्य पाहून देशवासियांनाही शोक अनावर झाला होता.

संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत सविस्तर निवेदन सादर केले. संसदेत मौन पाळून प्रथम या अपघातात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर राजनाथ सिंग यांनी ही दुर्घटना कशी घडली याचे सविस्तर निवेदन सादर केले. बुधवारी दुपारी ११ वाजून ४८ मिनिटांनी हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. १२ वाजून १५ मिनिटांनी हे हेलिकॉप्टर लॅण्ड करणार होते. मात्र १२ वाजून ८ मिनिटांनी या हेलिकॉप्टरचा सुलूर एअर ट्राफिक कन्ट्रोलशी असलेला संपर्क तुटल्याचे राजनाथ सिंग यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जनरल रावत यांना श्रद्धांजलीकाही स्थानिकांनी आवाज ऐकून आणि धूर पाहून घटनास्थळी धाव घेतली. तसेच काही काळातच बचावपथकही पोहोचले. मात्र १४ पैकी १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असे राजनाथ सिंग यांनी संसदेत सांगितले. या अपघाताची चौकशी करण्यासाठी एअर चिफ मार्शल मनिंदरसिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून चौकशी आधीच सुरु झाली आहे. या समितीचे सदस्य बुधवारीच दुर्घटनेच्या चौकशीसाठी वेलिंग्टनला पोहोचल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेला दिली.

संसदेत संरक्षणमंत्री ही माहिती देत असताना या दुर्घटनेआधीचा हेलिकॉप्टरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हेलिकॉप्टरचा आवाज ऐकून काही स्थानिकांनी आकाशातून जाणार्‍या या हेलिकॉप्टरचे शुटिंग केले होते. मात्र काही क्षणातच हे हेलिकॉप्टर ढगात लुप्त होते, हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. यावरुन अचानक वातावरण बदलल्याने हेलिकॉप्टरचा अपघात झाला असावा, अशी आशंका व्यक्त केली जात आहे. या हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्सही सापडला असून यातून आता अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गुरुवारी सकाळी जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि संरक्षणदलाच्या ११ अधिकार्‍यांचे पार्थिव वेलिंग्टन येथील ‘मद्रास रेजिमेंटल सेंटर’ येथे आणले होते. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि लष्करी अधिकार्‍यांनी जनरल रावत यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर देशाच्या पहिल्या संरक्षणदलप्रमुखांच्या पार्थिवाचा प्रवास मद्रास रेजिमेंटल सेंटरहून सुलूर हवाईतळासाठी सुरू झाला.

यावेळी जनरल रावत, त्यांची पत्नी व ११ अधिकार्‍यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मेत्तुपलयम बाजार भागात नागरिकांनी गर्दी केली होती. स्थानिकांनी ‘भारत माता की जय’, ‘वनक्कम् विरा’च्या घोषणा देत पार्थिव घेऊन जाणार्‍या रुग्णवाहिकांवर पुष्पवर्षाव केला. तर उपस्थित पोलीस जवानांसह काही नागरिकांनी देशाच्या या वीर सुपूत्रांना सॅल्यूट केला. जनरल बिपीन रावत यांनी लष्करी सेवेत असताना वेलिंग्टन येथील ‘डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज-डीएसएससी’मधून शिक्षण पूर्ण केले होते. त्यामुळे जनरल रावत यांचे पार्थिव नेत असताना वेलिंग्टन येथील नागरिकांना अश्रू अनावर झाले.

संध्याकाळी हे पार्थिव दिल्लीच्या पालम विमानतळावर पोहोचले. येथे पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेकांना शोक अनावर झाला होता. जनरल रावत यांच्या कुटुंबियांसह, मृत्यू पावलेल्या इतर अधिकार्‍यांचे कुटुंबियही येथे उपस्थित होते. पंतप्रधानांनी या सर्वांची भेट घेऊन त्यांची सांत्वना केली.

जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर जगभरातून शोकसंदेश

नवी दिल्ली – संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेल्या मृत्यूनंतर जगभरातून शोकसंदेश येत आहेत. अमेरिका-भारतामध्ये धोरणात्मक सहकार्य अधिक घट्ट करण्यात जनरल रावत यांची महत्त्वाची भूमिका होती, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तर रावत इस्रायलचे खरे मित्र होते. त्यामुळे त्यांचे अकाली जाणे दु:खद व धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दिली आहे. जनरल रावत यांच्या कार्यकाळात भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संरक्षण संबंधी अधिक मजबूत झाले, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी दिली आहे.

जनरल रावत व त्यांच्या सहकार्‍यांच्या अपघाती मृत्यूनंतर अमेरिका, फ्रान्स, रशिया, इस्रायल, जर्मनी, युरोपिय महासंघ, जपान, युएई, ग्रीस, स्वीडन, पोलंड, तैवान अशा वीसहून अधिक देशांनी शोक प्रकट केला आहे. शुक्रवारी दुपारी जनरल रावत यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी श्रीलंकेचे लष्करप्रमुख भारतात येणार आहेत. तसेच नेपाळ आणि भूतानचे उपलष्करप्रमुखही अंत्यसंस्कारासाठी भारतात येणार असल्याचे वृत्त आहे.

leave a reply