‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’ संघटनेला म्यानमारच्या जुंटा राजवटीने दहशतवादी ठरविले

‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’नेप्यितौे – म्यानमारमधील लोकशाहीवादी सरकार उलथणार्‍या लष्कराने (जुंटा) त्यांच्याविरोधात उभारण्यात आलेल्या ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’वर दहशतवादी संघटना असल्याचा ठपका ठेवला आहे. देशभरात घडणारे बॉम्बस्फोट, जाळपोळ व हत्यांसाठी ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’ जबाबदार असल्याचे सांगून यासंदर्भात घोषणा करण्यात आली. ही घोषणा म्हणजे म्यानमारच्या जुंटा राजवटीने लोकशाहीवादी आंदोलन चिरडण्यासाठी उचललेले नवे पाउल असल्याची टीका विश्‍लेषकांनी केली आहे.

‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’म्यानमारच्या लष्कराने फेब्रुवारी महिन्यात बंड करून सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. लष्कराच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी म्यानमारच्या जनतेने रस्त्यावर उतरून लोकशाहीवादी आंदोलनाला सुरुवात केली होती. लष्कराकडून सुरू असलेल्या क्रूर कारवाया व भीषण अत्याचारांनंतरही म्यानमारच्या जनतेने माघार घेतलेली नाही. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ आंदोलनाची धग कायम असून उलट त्याची व्याप्ती अधिकाधिक वाढताना दिसत आहे.

गेल्याच महिन्यात म्यानमारच्या लोकशाही राजवटीचा भाग असणारे नेते आणि वांशिक तसेच बंडखोर गटांनी एकत्र येऊन ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’ची स्थापना केली होती. हे ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’ जुंटा राजवटीच्या विरोधात समांतर सरकार म्हणून काम करेल, अशी घोषणाही त्यावेळी करण्यात आली होती. देशातील अनेक संघटना व गटांनी या ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’ला आपले समर्थन जाहीर केले होते. त्यात गेली अनेक दशके म्यानमारच्या लष्कराविरोधात संघर्ष करणार्‍या बंडखोर संघटनांचाही समावेश आहे.

‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’या वाढत्या समर्थनाच्या बळावर ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’ने काही दिवसांपूर्वी म्यानमारमधील जनतेच्या सुरक्षेसाठी ‘पीपल्स डिफेन्स फोर्स’ची उभारणी करण्याची घोषणा केली होती. हा फोर्स म्यानमारच्या लष्कराविरोधात उघड सशस्त्र संघर्ष करील, असे संकेतही देण्यात आले होते. त्यामुळे जुंटा राजवट अस्वस्थ झाली असून ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’ला दहशतवादी घोषित करणे त्याचाच भाग असल्याचे दिसत आहे. दहशतवादी संघटना ठरविल्यानंतर अधिक आक्रमकरित्या मोहीम राबवून समांतर सरकार व आंदोलन चिरडण्याची कारवाई केली जाईल, असा दावा विश्‍लेषकांनी केला आहे.

जुंटा राजवट आंदोलन चिरडण्यासाठी नवे मार्ग शोधत असतानाच म्यानमारमधील बंडखोर संघटना लष्कराविरोधात अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. शनिवारी चिन स्टेटमधील बंडखोर संघटनेने सुर्खुआ शहरातील पोलीस आऊटपोस्टवर हल्ला चढवून ते ताब्यात घेतल्याचा दावा केला. पोस्टवर तैनात असलेल्या १५ जवानांनी पळ काढला असून त्यानंतर पोस्ट जाळण्यात आल्याचेही ‘चिनलॅण्ड डिफेन्स फोर्स’ या संघटनेने म्हटले आहे.

leave a reply