नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग युक्रेन दौऱ्यावर

किव्ह – पाश्चिमात्य देशांची लष्करी संघटना म्हणून ओळखण्यात येणाऱ्या नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग गुरुवारी युक्रेन दौऱ्यावर दाखल झाले. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर नाटो प्रमुखांनी युक्रेनला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी स्टॉल्टनबर्ग यांनी जुलैमधील नाटो समिटमध्ये युक्रेनच्या सदस्यत्वाचा मुद्दा अजेंड्यावर असेल, असे संकेत दिले. नाटो प्रमुखांच्या या भेटीवर रशियाकडून प्रतिक्रिया उमटली असून युक्रेनचा नाटोतील समावेश रोखण्यास रशियाचे प्राधान्य कायम राहील, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी बजावले.

NATO Secretary-General Jens Stoltenberg visits Kyivगेल्या काही आठवड्यांमध्ये रशियन आक्रमणाची धार वाढली असून युक्रेनला लष्करी आघाडीवर फारसे यश मिळालेले नाही. युक्रेनच्या नेत्यांकडून सातत्याने प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेचा मुद्दा मांडण्यात येत असून त्यासाठी प्रचंड प्रमाणातील प्रगत शस्त्रसाठ्याची मागणी करण्यात येत आहे. यात लढाऊ विमाने व आधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणांचा समावेश आहे. मात्र युक्रेनला प्रगत शस्त्रास्त्रे पुरविण्यावरून नाटो सदस्य देशांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे युक्रेनला प्रत्यक्षात मर्यादित शस्त्रे व यंत्रणाच उपलब्ध होत असल्याचे समोर आले आहे.

याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी जर्मनीत ‘युक्रेन डिफेन्स कॉन्टॅक्ट ग्रुप’ची बैठक आयोजित होत आहे. या बैठकीसंदर्भात युक्रेनच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी नाटो प्रमुखांनी युक्रेनला भेट दिल्याचे सांगण्यात येते. आपल्या युक्रेन दौऱ्यात स्टॉल्टनबर्ग यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासह वरिष्ठ नेते व अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी युक्रेनच्या शस्त्रांच्या मागणीवर प्राधान्याने चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जुलै महिन्यात नाटोची वार्षिक बैठक होणार असून त्यात युक्रेनच्या सदस्यत्वाचा मुद्दा व संरक्षण हमी ही बाब अजेंड्यावर असेल, असे संकेत स्टॉल्टनबर्ग यांनी दिले आहेत. नाटो प्रमुखांच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर डेन्मार्क व नेदरलॅण्डस्‌‍ या दोन सदस्य देशांनी युक्रेनला १४ ‘लिओपार्ड’ रणगाडे पुरविण्याची घोषणा केली आहे.

leave a reply