पॅरिस – भविष्यातील युरोपच्या सुरक्षेची आखणी करताना नाटोने रशियाला सुरक्षाविषयक हमी द्यायला हवी, असा सल्ला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी भविष्यात क्षेपणास्त्र तैनाती, सुरक्षा व इतर संरक्षणविषयक मुद्यांवर रशियाशी नव्याने चर्चा केली जाईल, असे वक्तव्य केले होते. त्यापाठोपाठ मॅक्रॉन यांनी नाटोला उद्देशून केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनसह अमेरिका व नाटोला सुरक्षाविषयक हमी मागणारा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी, नाटोचा विस्तार थांबवावा व युक्रेनला नाटोचे सदस्यत्व देऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र युक्रेनसह पाश्चिमात्य आघाडीने हा प्रस्ताव फेटाळला होता. युद्ध सुरू झाल्यानंतरच्या शांतीचर्चेतही रशियाकडून या प्रस्तावाचा उल्लेख करण्यात आला होता.
गेल्या काही दिवसांपासून रशिया-युक्रेन शांतीचर्चेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी रशियाच्या सुरक्षाविषयक हमीचा उल्लेख करणे महत्त्वाचे ठरते. ‘आपण भविष्यातील सुरक्षाविषयक चौकटीचा विचार करणे गरजेचे आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, नाटो रशियाच्या सीमेनजकि येऊन ठाकली आहे, असे म्हटले होते. नाटोची संरक्षण तैनाती रशियासाठी धोकादायक असल्याकडेही पुतिन यांनी लक्ष वेधले होते. याबद्दल विचार होणे आवश्यक ठरते. हा मुद्दा शांतीचर्चेचा भाग आहे आणि युक्रेन युद्धानंतरच्या काळाचा विचारही आपण करायला हवा. आपल्या मित्रदेशांना सुरक्षित ठेवतानाच रशियालाही त्याच्या सुरक्षेची हमी द्यायला हवी’, या शब्दात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर नाटोने आपल्या सदस्य देशांमधील तैनाती वेगाने वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी फिनलंड व स्वीडन या दोन देशांना नाटोचे सदस्य म्हणून स्वीकारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. युक्रेनला सामील करून घेण्याची तयारी असल्याचेही नाटोकडून वारंवार सांगण्यात येत आहे.