वॉशिंग्टन/ब्रुसेल्स – रशिया-युक्रेन संघर्षाची वाढती तीव्रता व पोलंडमधील क्षेपणास्त्र हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाटोने युरोपमधील आपली लष्करी तैनाती अधिकाधिक वाढविण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर युरोपमध्ये नाटोचा आण्विक सराव सुरू असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यापाठोपाठ आता नाटो सदस्य देशांच्या पाच विमानवाहू युद्धनौका त्यांच्या ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप्स’सह युरोपच्या सागरी क्षेत्रात तैनात असल्याची माहिती उघड झाली आहे. अमेरिकी नौदलाने या वृत्ताला दुजोरा दिला.
युरोपच्या सागरी क्षेत्राचा भाग असणाऱ्या अटलांटिक महासागर, भूमध्य समुद्र व नॉर्थ सी या तीन भागांमध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स व इटलीच्या विमानवाहू युद्धनौका त्यांच्या ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप्स’सह गस्त घालत आहेत. अमेरिकेच्या ‘युएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश’ व ‘युएसएस गेराल्ड आर. फोर्ड’ या विमानवाहू युद्धनौकांचा यात समावेश आहे. ‘युएसएस गेराल्ड आर. फोर्ड’ ही अमेरिकी नौदलातील सर्वात नवी विमानवाहू युद्धनौका म्हणून ओळखली जाते.
अमेरिकेच्या दोन विमानवाहू युद्धनौकांव्यतिरिक्त फ्रान्सची ‘चार्ल्स द गॉल’, ब्रिटनची ‘एचएमएस एलिझाबेथ’ व इटलीच्या ‘आयटीएस कॅव्हर’ या विमानवाहू युद्धनौकांचा समावेश आहे. प्रत्येक विमानवाहू युद्धनौका व त्यांचे ग्रुप्स वेगवेगळ्या उद्देशाने तैनात असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. मात्र रशिया-युक्रेन युद्ध तीव्र होत असतानाच नाटो सदस्य देशांच्या पाच विमानवाहू युद्धनौका युरोपच्या सागरी क्षेत्रात उपस्थित असणे, ही बाब लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
रशियाच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर नाटोने युरोपातील संरक्षण तैनाती मोठ्या प्रमाणात वाढविण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी सदस्य देशांमधील समन्वय वाढावा यासाठीही वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. नाटोच्या ‘कलेक्टिव्ह डिफेन्स स्ट्रॅटेजी’चा अधिक प्रभावी वापर व्हावा यासाठी विविध आघाड्यांवर पावले उचलण्यात येत असून विमानवाहू युद्धनौकांची तैनाती व त्यांच्यातील समन्वयही त्याचाच भाग ठरतो, असा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे.
नाटोने यापूर्वीही विविध देशांच्या संरक्षणदलांच्या तैनातीमध्ये समन्वय साधण्याची क्षमता दाखवून दिली असून पाच विमानवाहू युद्धनौकांची तैनातीदेखील याचाच भाग असल्याचे नाटोचे वरिष्ठ अधिकारी व्हाईस ॲडमिरल केथ ब्लाँट यांनी सांगितले.