नाटोचा विस्तार आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थैर्य माजविणारा ठरेल

- रशियाच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

Sergei-Ryabkoमॉस्को/माद्रिद – नाटोचा विस्तार ही आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थैर्य वाढविणारी बाब ठरते, असा इशारा रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी दिला. नव्या विस्तारामुळे भर पडणाऱ्या सदस्य देशांच्या अथवा नाटोच्या सुरक्षेत कोणत्याही प्रकारचा बदल होणार नसल्याचेही रिब्कोव्ह यांनी यावेळी बजावले. नाटोच्या विस्ताराची प्रक्रिया हा रशियाला रोखण्याच्या आक्रमक धोरणाचाच भाग आहे व नव्या विस्तारानेही हे सिद्ध होते, याकडेही रशियन मंत्र्यांनी लक्ष वेधले.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेली सात दशके अलिप्ततेचे धोरण स्वीकारलेल्या फिनलँड व स्वीडनने नाटोत सामील होण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या महिन्यात दोन्ही देशांनी त्याची घोषणाही केली होती. आता नाटोनेही त्यांना सदस्यत्वासाठी आमंत्रण दिले असून प्रक्रिया ‘फास्ट-ट्रॅक’ करण्याचे संकेत दिले आहेत. दोन्ही देशांच्या सदस्यत्वाला विरोध करणाऱ्या तुर्कीनेही आपला विरोध मागे घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रशियाकडून प्रतिक्रिया उमटल्याचे दिसत आहे.

Nato-expansionनाटोचा विस्तार हा मुद्दा रशिया व पाश्चिमात्य देशांमधील संबंधांमध्ये कायम तणावाचा मुद्दा राहिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी या मुद्यावर आक्रमक भूमिका घेऊन रशियाची संरक्षणसज्जता वाढविण्यावर भर दिला. त्याचवेळी नाटोने रशियाच्या प्रभावक्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न केल्यास संघर्षाचा इशाराही दिला होता. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामागेही युक्रेनकडून नाटोच्या सदस्यत्वासाठी चाललेले प्रयत्न हे एक प्रमुख कारण होते. याआधी असे प्रयत्न करणाऱ्या जॉर्जियावरही रशियाने आक्रमण करून धडा शिकविला होता.

फिनलँड व स्वीडनने सदस्यत्वाबाबत घोषणा केल्यानंतरही रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी कारवाईचा इशारा दिला होता. आता उपपरराष्ट्रमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यातूनही रशिया आपली आक्रमक भूमिका कायम ठेवेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. नाटो ही आघाडी रशियाच्या सुरक्षेसाठी धोका असून त्याविरोधात रशिया योग्य पावले उचलेल, असेही उपपरराष्ट्रमंत्री रिब्कोव्ह यांनी बजावले आहे.

leave a reply