चीनला रोखण्यासाठी ‘इकॉनॉमिक नाटो’ची आवश्यकता

- ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रुस

तैपेई – ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रुस तैवानच्या पाच दिवसांच्या भेटीवर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर चीनकडून टीका होत असतानाच, ट्रुस यांनी चीनला रोखण्यासाठी जबरदस्त प्रस्ताव दिला आहे. चीन व तैवान यांच्यात संघर्ष पेटला तर साऱ्या जगाला फार मोठा आर्थिक फटका बसेल. म्हणूनच हे नुकसान टाळायचे असेल तर चीनच्या विरोधात ‘इकॉनॉमिक नाटो’ची आवश्यकता असल्याचे ट्रुस म्हणाल्या. नाटोच्या धर्तीवर पाश्चिमात्य देशांचा सहभाग असलेले प्रबळ आर्थिक संघटन अर्थात ‘इकॉनॉमिक नाटो’ची संकल्पना मांडून ट्रुस यांनी चीनला अस्वस्थ केले आहे.

चीनला रोखण्यासाठी ‘इकॉनॉमिक नाटो’ची आवश्यकता - ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रुसतैवानच्या विरोधात आक्रमक हालचाली करणाऱ्या चीनला रोखण्यासाठी तसेच साऊथ चायना सी क्षेत्रातील शांततेसाठी इतर देशांच्या लष्करी सहकार्याची आवश्यकता आहेच. कुठल्याही स्थितीत या लष्करी सहकार्याचे महत्त्व नाकाराता येणार नाही. पण चीन व तैवानमध्ये संघर्ष पेटला तर त्याचे जगावर होणारे आर्थिक परिणाम जबरदस्त असतील, हे लक्षात घेऊन त्याविरोधात पावले उचलावी लागतील, याची जाणीव लिझ ट्रुस यांनी करून दिली. हे सांगत असताना ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी इकॉनॉमिक नाटोची संकल्पना मांडली.

इतकेच नाही तर चीनसारख्या देशाबरोबर हवामान बदलासारख्या गंभीर समस्यांवर सहकार्य करण्यात काहीच अर्थ नसल्याचे लिझ ट्रुस यांनी पाश्चिमात्य देशांना बजावले आहे. कारण चीन कधीही सत्य उघड करीत नाही व हा देश पारदर्शक नाही, कोरोनाच्या साथीनंतर ही बाब प्रकर्षाने जगासमोर आली, असे सांगून ट्रुस यांनी चीनच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित केला. अशा देशाशी सहकार्य करताना पाश्चिमात्यांनी सावध रहावे, असे ट्रुस यांनी बजावले आहे.

दरम्यान, ट्रुस यांच्या या विधानांवर चीनकडून जहाल प्रतिक्रिया उमटली आहे. अपयशी राजकारणी म्हणून चीनने लिझ ट्रुस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ब्रिटनमधील चीनच्या दूतावासाच्या प्रवक्त्यांनी ट्रूस या अपयशी राजकारणी असून त्यांची विधाने अतिशय चिथावणीखोर असल्याचा ठपका ठेवला. याबरोबरच चीनच्या दूतावासाच्या प्रवक्त्याने ट्रुस यांच्या विधानांवरून ब्रिटनला इशारे दिले आहेत.

ट्रुस करीत असलेली विधाने म्हणजे ‘वन चायना पॉलिसी’ अर्थात तैवान हा चीनचा भाग असल्याचे मान्य करणाऱ्या धोरणाविरोधात जाणारी ठरतात. त्यांचा चीनच्या ब्रिटनबरोबरील संबधांवर परिणाम होऊ शकेल, असे या चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने बजावले आहे.

एकीकडे ट्रुस यांची अपयशी राजकारणी म्हणून हेटाळणी करीत असताना, त्यांच्या विधानांचा ब्रिटनबरोबरील द्विपक्षीय संबंधांवर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी धमकी चीनकडून दिली जात आहे. त्यामुळे चीन लिझ ट्रुस यांच्या या विधानांकडे चीन गांभिर्याने पाहत असल्याचे दिसते. इतकेच नाही तर ‘इकॉनॉमिक नाटो’ची संकल्पना चीनचे धाबे दणाणून टाकणारी असल्याचे संकेत मिळत आहेत.

हिंदी English

 

leave a reply