नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले

सुवर्णपदकनवी दिल्ली – १३ वर्षानंतर देशाला ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकून देऊन नीरज चोप्रा याने इतिहास घडविला. सार्‍या देशात या सुवर्णपदकाचा जल्लोष होत आहे. ट्रॅक फिल्ड क्रीडाप्रकारात भारताने जिंकलेले हे पहिले ऑलिंपिक सुवर्णपदक आहे. देशाने या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक जिंकावे अशी अपेक्षा काही दिवसांपूर्वी निधन झालेले धावपटू मिल्खा सिंग यांनी व्यक्त केली होती. त्याचे यथोचित स्मरण ठेवून नीरज चोप्रा याने आपले हे पदक मिल्खा सिंग यांना वाहिले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे. तर भारतीय लष्करात सुभेदार पदावर असलेल्या नीरज चोप्रा याची संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.

ऑलिंपिक स्पर्धेच्या १५ व्या दिवशी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने कांस्यपदक पटावले. त्यावर देशभरात आनंद व्यक्त केला जात असतानाच, भालाफेकीच्या स्पर्धेकडे भारतीयांच्या नजरा खिळल्या होत्या. आधीच्या फेरीत सर्वाधिक अंतरावर भाला फेकून नीरज चोप्रा याने भारतीयांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. सोशल मीडियावर नीरजने देशासाठी सुवर्णपदक जिंकावे, यासाठी प्रोत्साहन दिले जात होते. क्रीडाप्रेमींना नीरजने याआधी केलेल्या कामगिरीची कल्पना असल्याने, तो सुवर्णपदकापर्यंत धडक मारू शकतो, असा विश्‍वास वाटत होता. म्हणूनच त्याच्या कामगिरीकडे माध्यमांचेही लक्ष लागलेले होते. हरियाणातल्या पानीपत येथील नीरज याच्या घरी वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी पोहोचले होते.

या स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात नीरजने ८७.०३ अंतरावर भाला फेकला. ही या स्पर्धेतली सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. तर दुसर्‍या फेकीत याच्याही पुढे जाणारी कामगिरी करून नीरजने ८७.५८ अंतरावर भाला फेकला. याच्या पुढे जाणारी किंवा याच्या जवळपास पोहचू शकणारी कामगिरी नीरज याच्या प्रतिस्पर्ध्यांना जमू शकली नाही. या स्पर्धेत रौप्यपदक मिळालेल्या झेक प्रजासत्ताकाच्या वेसली याने ८६.६७ पर्यंत भाला फेकला होता. तर कांस्यपदक पटकावणार्‍या झेक प्रजासत्ताकाच्याच याकूब याने ८३.९८ अंतरावर फेक केली होती.

या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजला फोन करून त्याचे अभिनंदन केले. त्याच्या या यशामुळे सर्वच उदयोन्मुख खेळाडूंना जबरदस्त प्रेरणा मिळालेली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच याआधी झालेल्या दुखापतीतून सावरून नीरजने केलेली ही कामगिरी देशाच्या सदैव स्मरणात राहिल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तर आपले हे सुवर्णपदक मिल्खा सिंग यांना अर्पण करणार्‍या नीरज चोप्रा याने याआधी ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळविणार्‍या अभिनव बिंद्रा तसेच काही मिनीसेकंदांनी ऑलिंपिक पदक हुकलेल्या पी. टी. उषा यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ज्या भारतीय खेळाडूंचे ऑलिंपिक पदक अगदी थोडक्यात हुकले ते सारे या सुवर्णपदकामुळे नक्कीच आनंदित झाले असतील, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया नीरज चोप्रा याने दिली आहे.

leave a reply