इराणमध्ये राजवटीच्या विरोधात नवी निदर्शने

राजधानी तेहरानसह इतर भागात इराणच्या सर्वोच्च नेत्यांविरोधात घोषणा

iran protest hormozganतेहरान – गेल्या काही दिवसांच्या शांततेनंतर इराणमध्ये राजवटीच्या विरोधात नव्याने निदर्शने सुरू झाली आहेत. राजधानी तेहरानसह इराणमधील प्रमुख शहरांमध्ये शेकडो निदर्शक रस्त्यावर उतरुन निदर्शने करीत असल्याचे व्हिडिओज्‌‍ समोर आले आहेत. काही ठिकाणी निदर्शकांनी जाळपोळ करून इराणच्या सर्वोच्च नेत्यांविरोधात जोरदार घोषणा दिल्याच्या बातम्याही आल्या आहेत. इराणच्या राजवटीने निदर्शकांना दिलेल्या फाशीचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने राजवटीच्या विरोधातील निदर्शनांना पाठिंबा देणाऱ्या युरोपमधील बंडखोर इराणी नेत्यांच्या हत्येचा कट आखल्याचा दावा केला जातो.

4-Poisoning-of-girls-high-schools१६ सप्टेंबर रोजी कुर्द तरुणी माहसा अमिनीच्या संशयास्पद मृत्यूनंतर इराणमध्ये राजवटीच्या विरोधात निदर्शनांचा भडका उडाला. इराणमधील प्रत्येक गटाचे समर्थन मिळालेली ही निदर्शने दडपण्यासाठी इराणच्या सुरक्षा यंत्रणेने केलेल्या कारवाईत ५२९ जणांचा बळी गेला तर जवळपास २०,००० जणांना ताब्यात घेतल्याची माहिती स्थानिक मानवाधिकार संघटनेने दिली. यापैकी पाच जणांना इराणने फाशीची शिक्षा सुनावली होती. गेल्याच महिन्यात इराणच्या यंत्रणेने दोन तरुणांना फाशी दिली. इराणच्या संस्कृतीप्रमाणे मृतांना आदरांजली देण्यासाठी ४० दिवसांचा दुखवटा पाळला जातो.

गुरुवारी हा दुखवटा पूर्ण झाल्याबरोबर इराणच्या प्रमुख शहरांमध्ये राजवटीच्या विरोधात नव्याने निदर्शने सुरू झाली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थांनी या निदर्शनांचे प्रसारण करण्याचे टाळले. पण तेहरानसह, अराक, इस्फाहन, इझेह, कराज, सनांदज, रश्त, होरमोझगान या शहरांमध्ये निदर्शने पुकारण्यात आली होती, असे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या माहिती व व्हिडिओज्‌‍चा हवाला देऊन म्हटले आहे. मुख्य म्हणजे कुर्दवंशियांच्या भागाबरोबरच इराणच्या राजवटीचा प्रभाव असलेल्या शहरांमध्येही ही निदर्शने पार पडली.

iran protestराजधानी तेहरान व सनांदज या शहरांमध्ये निदर्शकांनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात ‘हुकूमशहाचा विनाश होवो’ अशा घोषणा दिल्या. याआधीही इराणमधील निदर्शनात देशाचे सर्वाधिकार हाती असलेल्या खामेनी यांच्याविरोधात निदर्शनांच्या माध्यमातून संताप व्यक्त केला होता. इराणमधील इस्लामी क्रांतीचे संस्थापक आयातुल्ला खोमेनी यांच्याविरोधातही घोषणा दिल्याचे या निदर्शनांमधून समोर आले होते. यामागे अमेरिका, सौदी अरेबिया, इस्रायल तसेच इराणमधील राजवटविरोधी गट जबाबदार असल्याचा आरोप इराणने केला होता.

पण गेल्या चार महिन्यांमध्ये इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष, माजी पंतप्रधान, राजकीय प्रभाव असलेले वरिष्ठ नेते, तसेच धार्मिक नेतेही निदर्शनांच्या समर्थनार्थ उतरले. त्यामुळे इराणच्या राजवटीची कोंडी झाल्याचा दावा केला जातो. या निदर्शनांमुळे आयातुल्ला खामेनी यांची लोकप्रियता घटल्याचे बोलले जाते. इराणच्या राजवटीचा प्रभाव असलेल्या कोम शहरातही सरकारविरोधी निदर्शने पुकारण्यात आली होती. त्याचबरोबर कोम शहरातील शालेय विद्यार्थ्यांवर विषप्रयोग झाल्याचा आरोपही सुरू झाला आहे. ३० नोव्हेंबर रोजी येथील १२ शाळांमधील २०० विद्यार्थीनी व एका महिला शिक्षिकेला संशयास्पदरित्या विषबाधा झाली. यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

दरम्यान, पाश्चिमात्य देशांमधून इराणच्या राजवटीच्या विरोधात आंदोलन उभे करणाऱ्या बंडखोर इराणी नेत्यांचा काटा काढण्याची तयारी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने केली आहे, असे पाश्चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply