नायजेरियन बंडखोरांनी 140 विद्यार्थ्यांचे अपहरण केले

अपहरण केले

अबुजा – नायजेरियाच्या कदुना प्रांतात सशस्त्र बंडखोर गटाने एका शाळेवर हल्ला चढवून 140हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांचे अपहरण केले आहे. या घटनेपूर्वी झारिआतील एका रुग्णालयातून तीन मुलांसह 12 जणांचे अपहरण झाल्याची घटनाही समोर आली आहे. कदुनाच्या ‘चिकुन डिस्ट्रिक्ट’मध्ये घडलेली विद्यार्थ्यांच्या अपहरणाची घटना गेल्या आठ महिन्यातील ‘मास किडनॅपिंग’ची 10वी घटना असल्याचे सांगण्यात येते. 2014 साली बोको हराम या दहशतवादी संघटनेने केलेल्या विद्यार्थिनींच्या अपहरणाच्या घटनेनंतर अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर येत आहे.

सोमवारी पहाटेच्या सुमारास गाड्यांमधून आलेल्या सशस्त्र बंडखोरांनी चिकुन डिस्ट्रिक्टमधील ‘बेथेल बाप्टिस्ट हायस्कूल’वर हल्ला चढविला. हल्लादरम्यान शाळेचे सुरक्षरक्षक जखमी झाल्याचे सांगण्यात येते. बंडखोरांच्या गटाने शाळेच्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे अपहरण करून त्यांना जंगलात नेल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपहरणाच्या घटनेची माहिती कळताच लष्कराने बंडखोरांचा पाठलाग सुरू केला असून शोधमोहीम अद्याप सुरू असल्याचे सांगण्यात येते.

अपहरण केलेमोहिमेदरम्यान 25 विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेची सुटका करण्यात आली असली तरी उर्वरित विद्यार्थी व शिक्षक अद्यापही बेपत्ता आहेत. विद्यार्थ्यांचे अपहरण खंडणीसाठीच झाले असावे, असा दावा शाळेतील अधिकारी तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. अपहरणाची घटना घडली त्यावेळी शाळेत सुमारे 180 विद्यार्थी होते, असा दावा करण्यात आला आहे. सोमवारच्या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने विभागातील इतर शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

अपहरण केलेकदुनामधील अपहरणाच्या घटनेपूर्वी झरिआमध्येही अपहरणाची घटना घडल्याचे समोर आले आहे. रविवारी झरिआतील पोलीस स्टेशन तसेच रुग्णालयावर सशस्त्र गटाने हल्ला चढविला. त्यानंतर रुग्णालयात घुसून छोटी मुले, परिचारिका व कर्मचार्‍यांसह 12 जणांचे अपहरण केले. सुरक्षादलांनी शोधमोहीम सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या डिसेंबर महिन्यापासून नायजेरियाच्या वायव्य भागात ‘मास किडनॅपिंग’च्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. यात प्रामुख्याने शाळा व वसतीगृहांना लक्ष्य करण्यात येत आहे. गेल्या आठ महिन्यात 10हून अधिक ‘मास किडनॅपिंग’च्या घटना घडल्या असून त्यात एक हजारांहून अधिक विद्यार्थी व शिक्षकांचे अपहरण करण्यात आले आहे. यातील 200 हून अधिक विद्यार्थी अजूनही बेपत्ता असून त्यांचा दहशतवादी तसेच बंडखोर संघटनांकडून ‘चाईल्ड सोल्जर’ म्हणून वापर होत असावा, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

leave a reply