आजच्या भारतावर कुणालाही दबाव टाकता येणार नाही

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ठणकावले

कॅम्पाला – आपल्या सुरक्षेला मिळणाऱ्या आव्हानांना प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य आत्ताच्या भारताकडे आहे. उरी असो वा बालाकोट, आपल्या विरोधातील दहशतवादी कारवायांना भारत जोरदार प्रत्युत्तर देतो. याची साऱ्या जगाला दखल घ्यावी लागत आहे. चीनच्या एलएसीवरील दुर्गम भागात भारतीय सैन्य अत्यंत खडतर परिस्थितीत तैनात आहे. आजचा भारत आपले निर्णय स्वतः घेतो, दुसऱ्या देशांनी टाकलेल्या दडपणाचा भारताच्या निर्णयावर परिणाम होत नाही. काय करायचे आणि काय नाही, कुणाकडून इंधन खरेदी करायचे किंवा करायचे नाही, ते भारत इतरांच्या सूचनेवरून ठरवत नाही. आजचा भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेला आहे, अशा खणखणीत शब्दात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एकाच वेळी पाकिस्तान व चीनसह अमेरिका आणि भारतावर दडपण टाकू पाहणाऱ्या युरोपिय देशांनाही खडसावले.

आजच्या भारतावर कुणालाही दबाव टाकता येणार नाही - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ठणकावलेयुगांडाच्या दौऱ्यावर असताना, बुधवारी भारतीय समुदायाला संबोधित करताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आजचा भारत आधीच्या तुलनेत खूपच वेगळा आहे, याची जाणीव करून दिली. आजच्या भारताकडे आपल्या सुरक्षेसमोरील आव्हानांना प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य आहे, असे सांगून २०१६ सालच्या उरी येथील तर २०१९ सालच्या पठाणकोट येथील हल्ल्याला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले होते, याची आठवण परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली. इतकेच नाही तर चीनने सीमाकराराचे उल्लंघन केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून भारतीय सैन्य एलएसीवर दुर्गम भागात अत्यंत खडतर परिस्थित तैनात आहे, याकडे परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले.

एलएसीवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना सरकारचे पूर्ण पाठबळ असून त्यांना आवश्यक असलेली शस्त्रास्त्रे पुरवून इथे त्यांच्यासाठी सोयीसुविधा व पायाभूत सुविधा विकसित करण्यात आलेल्या आहेत. मात्र अजूनही एलएसीवरील पायाभूत सुविधांच्या विकासाचे काम पूर्ण झालेले नाही, पण या कामाला वेग देण्यात येत आहे, असे जयशंकर पुढे म्हणाले. आधीच्या काळात एलएसीवर पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले होते, पण आता याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याची बाब परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्षात आणून दिली.

आत्ताचा भारत बाह्य दबाव झुगारून देतो. काय करावे आणि काय करू नये, कुणाकडून इंधनाची खरेदी करावी किंवा करू नये, याच्या इतर देशांकडून येणाऱ्या सूचनांचे पालन भारत करीत नाही. भारत आपल्या जनतेच्या हितासाठी आवश्यक असलेले निर्णय स्वतःच घेतो, असे सांगू परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाकडून भारत खरेदी करीत असलेल्या इंधनाचे समर्थन केले. इतर देशांच्या दडपणाचा भारताच्या निर्णयावर परिणाम होत नाही. त्यामुळे आजचा भारत खऱ्या अर्थाने अधिक स्वतंत्र आहे, असे परराष्ट्रमंत्र्यांनी ठणकावले.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका व युरोपिय देश भारतावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारताला चीनपासून धोका असल्याचे अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी व मुत्सद्दी आणि अभ्यासगट सातत्याने बजावत आहेत. एलएसीवर चीन भारताच्या विरोधात कारवाया करीत असताना, अमेरिका भारताच्या बाजूने ठामपणे उभी राहणार असल्याचे दावे अमेरिकेकडून करण्यात येत आहेत. अरुणाचल प्रदेशवर दावा सांगणाऱ्या चीनला, हा भारताचाच भूप्रदेश असल्याचे अमेरिकेने बजावले होते. पण अशारितीने भारताला पाठिंबा देत असताना, भारताने चीनसह रशियाचीही साथ सोडून द्यावी, अशी मागणी अमेरिकेचे लोकप्रतिनिधी करू लागले आहेत.

चीनकडून मिळत असलेल्या आव्हानांविरोधात भारताला अमेरिकेचे सहाय्य हवे असेल, तर रशियाकडून इंधनाची व शस्त्रास्त्रांची खरेदी थांबवा, असा संदेश याद्वारे अमेरिका भारताला देत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेचे नेते आणि राजनैतिक अधिकारी वेगवेगळ्या शब्दात आणि निरनिराळ्या मार्गाने भारताला ही जाणीव करून देत आहेत. अशा परिस्थितीत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आपल्या सुरक्षेला मिळणाऱ्या आव्हानांना प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य भारताकडे असल्याचे बजावले आहे. पाकिस्तान व चीनसह, भारताला सातत्याने इशारे देणाऱ्या अमेरिकेलाही याद्वारे परराष्ट्रमंत्र्यांनी योग्य तो संदेश दिल्याचे दिसते.

चीनपासून संभवणाऱ्या धोक्याविरोधात भारताला सहाय्य करणे म्हणजे आपली अधिकाधिक शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याची विक्री भारताला करणे, असे अमेरिकेला अपेक्षित आहे. त्याचवेळी चीनचे रशियाबरोबरील सहकार्य लक्षात घेता, भारताने रशियापासून देखील दूर व्हावे, असे अमेरिका सुचवित आहे. पण चीनसाठी रशिया आपली भारताबरोबरील पारंपरिक मैत्री पणाला लावण्यास तयार नाही. तर चीनच्या विरोधात अमेरिकेची साथ मिळावी, यासाठी भारत रशियाला दूर करण्यास तयार नाही, हे अनेकवार उघड झालेले आहे. म्हणूनच अस्वस्थ झालेली अमेरिका भारताला यावरून पुन्हा पुन्हा इशारे देत असल्याचे दिसते. मात्र परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आजच्या भारतावर कुणालाही दबाव टाकता येणार नाही, याची जाणीव अमेरिका व अमेरिकेचे सहकारी असलेल्या युरोपिय देशांनाही करून दिलेली आहे.

leave a reply