उत्तर कोरियाने स्वतःला अण्वस्त्रसज्ज देश घोषित केले

- जगभरातून तीव्र प्रतिक्रिया

अण्वस्त्रसज्जसेऊल/पॅरिस – इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या आक्रमक कारवाया तणाव वाढवित आहेत. अशा परिस्थितीत उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन उन यांनी आपला देश अण्वस्त्रसज्ज असल्याचे घोषित केले. हा निर्णय मागे घेता येणार नसल्याचे सांगून किम जाँग-उन यांनी अण्वस्त्रप्रसारबंदीची शक्यता निकालात काढली. त्याचबरोबर आपल्या हुकूमशहांची हत्या किंवा त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यास संबंधित देशावर अणुहल्ला चढविण्याचा कायदाही उत्तर कोरियाने पारित केला आहे. उत्तर कोरियाचा हा नवीन कायदा आणि घोषणा या क्षेत्रातील शांततेसाठी धोकादायक असल्याची प्रतिक्रिया अमेरिका, फ्रान्स सारख्या आघाडीच्या देशांनी दिली आहे.

उत्तर कोरियाच्या हुकूमशहांनी गुरुवारी आपल्या अधिकाऱ्यांसमोर केलेल्या घोषणेत आपला देश अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले. ‘उत्तर कोरिया हा अण्वस्त्रसज्ज देश आहे. आत्ता या देशाच्या आण्विक शस्त्रास्त्र धोरणात काही अपरिवर्तनीय बदल करणे आवश्यक आहे. जेणेकरुन उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांबाबत कुठलीही सौदेबाजी होऊ शकणार नाही’, अशा शब्दात किम जाँग-उन यांनी नव्या उत्तर कोरियाबरोबर अण्वस्त्रप्रसारबंदी शक्य नसल्याचे बजावले. आपल्या देशावर 100 वर्षांसाठी निर्बंध जरी लादले तरी अण्वस्त्रांचा ताबा सोडणार नसल्याचे उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने ठणकावले.

अण्वस्त्रसज्जत्याचबरोबर 2013 साली आपल्या देशाने अण्वस्त्रांबाबत पारित केलेल्या नियमांमध्येही दुरूस्ती केली. यानुसार, उत्तर कोरियाच्या नेतृत्वाला अण्वस्त्रांचा वापर करण्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत. येत्या काळात किम जाँग-उन यांची हत्या घडविण्यात आली किंवा त्यांचा संशयास्पदरित्या मृत्य झ्ाालाच किंवा उत्तर कोरियाच्या सुरक्षेला धोका निर्माण झ्ाालाच तर शत्रूदेशांवर अणुहल्ला चढवू शकतो, असे या नव्या नियमात म्हटले आहे. अर्थात उत्तर कोरिया कुठल्याही क्षणी आपल्या शत्रूदेशाविरोधात अणुयुद्ध छेडू शकतो, असा इशाराच उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने दिला आहे.

गेल्या वर्षभरात उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रचाचण्यांचा धडाका लावून कोरियन क्षेत्रात तणाव निर्माण केला होता. त्याचबरोबर चार वर्षानंतर लष्करी सराव सुरू करणाऱ्या अमेरिका आणि दक्षिण कोरियालाही उत्तर कोरियाने धमकावले होते. अमेरिकेच्या अतिपूर्वेकडील शहरांना लक्ष्य करण्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता. पण उत्तर कोरियाने स्वत:ला अण्वस्त्रसज्ज देश जाहीर करून अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाला थेट आव्हान दिल्याचा दावा केला जातो.

उत्तर कोरियाच्या या घोषणेवर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कम्युनिस्ट राजवटीने अण्वस्त्रांबाबत नवा कायदा करून अणुहल्ल्याची तयारी केल्याचा आरोप फ्रान्सने केला आहे. उत्तर कोरियाचा हा निर्णय या क्षेत्रासह आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असल्याचा इशारा फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांनी या निर्णयावर तीव्र चिंता व्यक्त करून उत्तर कोरियाला चर्चेसाठी आवाहन केले आहे.

leave a reply