उत्तर कोरियाने ‘ईस्टर्न सी’च्या क्षेत्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले

-सोव्हिएत रशियन कालीन क्षेपणास्त्राचे सुटे भाग सापडल्याची दक्षिण कोरियाची घोषणा

korean missile pieceसेऊल – अमेरिका आणि दक्षिण कोरियामधील युद्धसराव संपल्यानंतरही उत्तर कोरियाने या क्षेत्रातील क्षेपणास्त्र चाचण्या सुरू ठेवल्या आहेत. बुधवारी सकाळी उत्तर कोरियाने डागलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘ईस्टर्न सी’च्या क्षेत्रात कोसळले. दक्षिण कोरिया आणि जपानच्या सागरी हद्दीजवळ हे क्षेपणास्त्र कोसळल्याचा दावा जपानच्या तटरक्षक दलाने केला. तर गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने प्रक्षेपित केलेल्या सोव्हिएत रशियन काळातील क्षेपणास्त्राचे सुटे भाग दक्षिण कोरियाने जगासमोर पुराव्यादाखल मांडले आहेत.

गेल्या आठवड्यात अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या २४० हून अधिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्सचा समावेश असलेल्या ‘व्हिजिलंट स्टॉर्म’ हवाईसराव सुरू होता. अमेरिकेने आपल्यावर अणुहल्ला चढविण्यासाठी हा सराव सुरू केल्याचा आरोप करून उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावला होता. गेल्या बुधवारी उत्तर कोरियाने ईस्टर्न सीच्या सागरी क्षेत्रात २४ क्षेपणास्त्रे डागली होती. यातील एक क्षेपणास्त्र दक्षिण कोरियाच्या सागरी हद्दीत आणि किनारपट्टीपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावर कोसळले होते.

या क्षेपणास्त्र चाचणीद्वारे उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप दक्षिण कोरियाने केला होता. पण आपल्यावरील टीकेकडे दुर्लक्ष करून उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या सुरू ठेवल्या. या काळात दक्षिण कोरियन नौदलाने आपल्या सागरी क्षेत्रात कोसळलेल्या उत्तर कोरियन क्षेपणास्त्राचे सुटे भाग मिळविण्यासाठी मोहीम सुरू केली होती. बुधवारी सकाळी दक्षिण कोरियन नौदलाने सदर क्षेपणास्त्राचे इंजिन व इतर सुटे भाग माध्यमांसमोर मांडले.

सोव्हिएत रशियन काळातील जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या ‘एसए-५’ या लघू पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे हे सुटे भाग असल्याचे दक्षिण कोरियाने जाहीर केले. गेल्या आठ महिन्यांपासून युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धातही रशियाने अशाच क्षेपणास्त्राचा वापर केल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. अशा क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन दक्षिण कोरियाने जाणुनबुजून चिथावणी दिल्याचा आरोप दक्षिण कोरियाने केला. यानंतर उत्तर कोरियाने बुधवारी ईस्टर्न सीमध्ये क्षेपणास्त्र डागले.

बुधवारी सकाळी उत्तर कोरियाने डागलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र २५० किलोमीटर अंतर ओलांडल्यानंतर ईस्टर्न सी क्षेत्रात कोसळले. दक्षिण कोरिया तसेच जपानच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. या क्षेपणास्त्राचे अधिक तपशील समोर आलेले नाहीत. पण दक्षिण कोरिया व जपानने चीनच्या राजदूतांमार्फत उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीविरोधात आपला निषेध नोंदविला.

दरम्यान, येत्या शुक्रवारपासून व्हिएतनाममध्ये आग्नेय आशियाई देशांची ‘असियान’ बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अमेरिका आणि दक्षिण कोरिया उत्तर कोरियाच्या प्रक्षोभक क्षेपणास्त्र चाचण्यांचा मुद्दा उपस्थित करून चीनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील, असा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत.

leave a reply