सेऊल – दक्षिण कोरियाच्या दिशेने २३ क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण केल्यानंतर उत्तर कोरियाने गुरुवारी नव्याने सहा क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा समावेश आहे. तर एक क्षेपणास्त्र दिशा भरकटून जपानच्या विशेष आर्थिक सागरी क्षेत्रात कोसळले. यानंतर जपानने किनारपट्टीजवळच्या आपल्या नागरिकांना शहरे रिकामी करण्याचे आदेश दिले. तर अमेरिका व दक्षिण कोरियाने संयुक्त हवाईसरावाचा कालावधी वाढविण्याची घोषणा केली. यावर भडकलेल्या उत्तर कोरियाने अमेरिका फार मोठी चूक करीत असल्याची धमकी दिली.
अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या हवाईदलात सुरू असलेल्या व्हिजिलंट स्टॉर्म या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या युद्धसरावाच्या विरोधात उत्तर कोरियाने बुधवारी २३ क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण केले. यातील एक क्षेपणास्त्र दक्षिण कोरियाच्या किनारपट्टीपासून अवघ्या ५७ किलोमीटर अंतरावर समुद्रात कोसळले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियाने देखील लढाऊ विमाने रवाना करून उत्तर कोरियाच्या हद्दीत क्षेपणास्त्रे डागली होती. दक्षिण कोरियाने पहिल्यांदाच स्वीकारलेल्या या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
याला काही तास उलटत नाही तोच, गुरुवारी सकाळी उत्तर कोरियाने पुन्हा एकदा क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. पण यावेळी उत्तर कोरियाने लघू पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांबरोबरच आंतरखंडीय क्षेपणास्त्राचीही चाचणी केली. सदर आंतरखंडीय क्षेपणास्त्र निर्धारित उंची गाठण्यात अपयशी ठरले आणि जपानच्या विशेष आर्थिक सागरी क्षेत्र अर्थात ‘ईईझेड’मध्ये कोसळल्याचा आरोप जपानने केला आहे. यामुळे सावध झालेल्या जपानने आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्यासाठी अलर्ट जारी केला.
अमेरिका व दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीवर जोरदार टीका केली. तसेच शुक्रवारी संपुष्टात येणारा व्हिजिलंट स्टॉर्म हा युद्धसरावाची मुदत वाढविल्याचे घोषित केले. या युद्धसरावाद्वारे अमेरिकेने आपल्याविरोधात अणुयुद्धाची तयारी केल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला होता. तसेच यासाठी अमेरिकेला सामर्थ्यशाली उत्तर देण्याची धमकी उत्तर कोरियाने दिली होती. अशा परिस्थितीत, अमेरिका व दक्षिण कोरियाने याच युद्धसरावाची मुदत वाढवून उत्तर कोरियाला चिथावणी दिली आहे.
अमेरिकेच्या या घोषणेवर उत्तर कोरियाकडून प्रतिक्रिया आली आहे. ‘अमेरिका व दक्षिण कोरियाने युद्धसरावाची मुदत वाढवून अतिशय धोकादायक निर्णय घेतला आहे. यामुळे या क्षेत्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अमेरिका व दक्षिण कोरियाच्या या चुकीची दुरूस्ती होऊ शकत नाही’, अशी नवी धमकी उत्तर कोरियाच्या सेंट्रल कमिटीचे सचिव पाक जाँग शोन यांनी दिली.